चंद्रपूर - पाण्याची खालावलेली पातळी, नदीमध्ये साचलेला गाळ आणि त्यातून होणारा अत्यल्प पाणीपुरवठा यामुळे चिमूर शहरातील नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. यावेळी नगरपरिषदेने नामी शक्कल लढवत यावर तोडगा काढण्याचा भक्कम प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी नदीमध्येच ट्रॅक्टर चालवून नांगरणी केली. यामुळे पाणी जिरुन भूजल पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चिमूर येथील उमा नदीत पुराच्या पाण्यासोबत आलेला गाळ, रेती, मातीमुळे नदीचे पात्र सपाट झालेले आहे. सतत गाळ बसल्याने मातीचा मोठा थर पात्रात जमा झाला आहे. यामूळे नदीत वाहून आलेले पाणी जिरत नाही. पर्यायाने भूजल पातळी खालावली असून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी चिमूर नगरपरिषदेने नामी शक्कल लढवली. त्यांनी नदीजवळ बांधलेल्या बंधाऱ्याच्या पात्रात थेट ट्रॅक्टरने नांगर चालवला. नगरपरिषदेने महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाच्या बाजुला बंधाऱ्याच्या पात्रात नांगर ७०० मीटरपर्यंत चालवला आहे.
त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईवर मात करणारा हा उत्तम प्रयोग मानला जात आहे. या प्रयोगाची परिसरात चर्चाही होत आहे.