चंद्रपूर- राज्यातील भाजप सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने केला होता. यातून खऱ्या आरोपींना वाचविण्याचे काम झाले. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारने आता हे प्रकरण तपासात घेतले तर भाजपचे पाप उघडकीस येईल. या भीतीनेच हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला आहे, असा आरोप राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. जिल्हा क्रीडा संकुलातील धावपट्टीचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा- अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ
कोरेगाव भीमा येथे जे काही घडले त्याचा तपास योग्यरित्या करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. केंद्र आणि राज्याची भूमिका ही आपसात विश्वासाची असायला पाहिजे. मात्र, कोरेगाव भीमा प्रकरणात केंद्र सरकारने ठिणगी पाडण्याचे काम केले. यामुळे केंद्र आणि राज्यात तणाव निर्माण होणार आहे. जर राष्ट्रीय तपास यंत्रणा लावायची होती तर ती भाजप सत्तेवर असताना का लावली नाही? असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.