चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या लगत असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या गेस्ट हाऊसजवळ दोन वाघांनी आपले बस्तान मांडले आहे. या गेस्टहाऊस जवळ लागून असलेल्या नाल्यात ह्या दोन वाघांचे दर्शन होत असून त्यांनी एका म्हशीची शिकार केली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना या दोन वाघांचे दर्शन होत आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा परिसर हा ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाला लागून आहे. तसेच हा परिसर गर्द वनराईने नटलेला आहे. त्यामुळे येथे वन्यजीवांचा वावर असतो. बिबट्या, अस्वल आणि वाघांचे दर्शन येथे नेहमी घडत असते. विशेष म्हणजे वाघिण येथे प्रसूत होण्यासाठी येतात असे आढळून आलेले आहे. सहज शिकार करायला मोकाट जनावरे, प्यायला मुबलक पाणी आणि लपायला झुडुपे. त्यामुळे येथे वाघांचा मुक्तसंचार असतो. सध्या अशाच एक वाघांची जोडी वीज केंद्राच्या हिराई विश्रामगृहालगत असलेल्या परिसरात दिसून येत आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, वाघांची ही जोडी गेल्या अनेक दिवसांपासून इथे आहे. त्यावर विभागाची नजर आहे. वास्तव्यासाठी योग्य ठिकाणी सापडल्याने त्यांनी इथे बस्तान मांडले. एका म्हशीची शिकार करून त्यावर ताव मारतानाचे दृश्य कॅमेराबद्ध झाले असून, ते व्हायरल होत आहेत. हे दोन्ही वाघ नुकतेच आपल्या आईपासून वेगळे झाले आहेत. ते स्वतः जगण्याची कला अवगत करीत आहेत. याचाच भाग म्हणून त्यांनी म्हशीची शिकार केली. आणखी काही दिवस हे वाघ इथे ठाण मांडून बसणार अशी शक्यता आहे. सध्या तरी या वाघांचे येणाऱ्या जाणाऱ्यांना दर्शन घडत आहेत.