चंद्रपूर - राजुरा येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती.
या प्रकरणात पोलीस तपासाबाबत असमाधानी असलेल्या पीडितांच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याची दखल घेत न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. चार सदस्यीय समितीच्या निगराणीत हा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. यानंतर पोलीस विभागाने उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार केले होते.
अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. पोलीस तपासाबाबत नागरिकांच्या मनात साशंकता आहे. यामुळे राजुरा येथे तणावाची स्थिती आहे. याचा उद्रेक कधीही होऊ शकतो. त्यामुळे सीआयडी तपास करण्यात यावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. ही मागणी मान्य करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.