चंद्रपूर - ताडोबात अंधारी व्याघ्रप्रकल्प परिसरात एक वाघ आज मृतावस्थेत आढळला. ही घटना मोहूर्ली बफर क्षेत्रात आज सकाळच्या सुमारास निदर्शनास आली. वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आता वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. वाघांचे संरक्षण आणि संवर्धन योग्यरीत्या केल्याने या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, यामुळे वाघांच्या संघर्षात वाढ झाली आहे. आपल्या क्षेत्रात अधिराज्य असण्यासाठी अनेकदा दोन वाघांमध्ये झटापट होते आणि यात वाघाचा मृत्यू होतो. आज सकाळी ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पात येणाऱ्या मोहूर्ली बफर क्षेत्रातील मुधोली येथील शेतशिवारात एक अडीच ते तीन वर्षांचा वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आले. अन्य वाघाच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ताडोबाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या तज्ञ लोकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. अधिकचा तपास सुरू आहे. ताडोबातील प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे.