चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या बंदर या कोळसा ब्लॉकला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचा लिलाव होणार आहे. जर येथे कोळसा खाण सुरू झाली, तर ताडोबातील वाघांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. हा परिसर कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. या मार्गानेच वाघ इतर व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर करू शकतात. जर कोळसा खाण सुरू झाली तर वाघांच्या हालचालीवर पायबंद बसणार आहे. याबाबत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट करून चिंता व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने ज्या 41 कोळसा ब्लॉकला लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकचा समावेश आहे. हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील समजला जातो. कारण याच मार्गाने वर्धा येथील बोर व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प लागतो. त्यामुळे वाघांचे स्थलांतर होऊ शकते. याला कॉरिडॉर म्हटले जाते. वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी तो अत्यंत महत्वाचा असतो. ताडोबातील उत्तर दिशेला असलेला हा परिसर अरुंद आहे. त्यातही कोळसा खाणीला मंजुरी दिली तर उत्तरेकडील ताडोबा क्षेत्रातील वन्यजीवांचे स्थलांतर पूर्णपणे थांबून जाणार आहे. अशावेळी मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचणार आहे. आधीच ताडोबात वाघांच्या वाढत्या संख्येने ही परिस्थिती ओढविली आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला. पुढे ही परिस्थिती आणखी स्फोटक होणार आहे. त्यामुळे आता या केंद्राने जाहीर केलेल्या बंदर कोळसा ब्लॉक बाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट करून यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ताडोबाला लागून हा परिसर असल्याने कुठल्याही परिस्थितीत कोळसा उत्खनन होऊ नये, अशी मागणी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. 'सेव्ह ताडोबा' अशी हाक त्यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे. याबाबत आता वन्यजीव प्रेमींकडून देखील चिंता व्यक्त होत आहे. जर कोळसा उत्खननासाठी मंजुरी दिली, तर संख्येत वाढ झालेल्या वाघात परिसरासाठी आपसात संघर्ष निर्माण होईल. त्यात अनेक वाघांचा जीव जाईल. मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचेल, प्रजननावर मर्यादा येईल. त्यामुळे त्यांच्यात अनेक विकार निर्माण होतील. जर असे झाले, तर ही अत्यंत धोकादायक स्थिती असेल. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च प्राणी आहे. जंगलाचा तो केंद्रबिंदू आहे. जर वाघ संपला तर पर्यावरणाच्या असंतुलनाची फळे मानवाला भोगावे लागतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.