चंद्रपूर - शहरालगत असलेल्या माना टेकडी येथे वाघ आणि बिबट्याची दहशत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या हल्ल्यात येथील ग्रामस्थांची जनावरे जखमी होत आहेत. दरम्यान, गुरुवारी बिबट्याने बैलावर हल्ला करून जखमी केले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांसह वेकोली व वनविभागाच्या अधिकार्यांची उपस्थिती होती.
यादरम्यान परिसरातील झाडी-झूडपी साफ करून विजेची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनविभागाला दिल्या. चंद्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा जंगलातील हिंसक प्राणी शहरात शिरल्याच्या घटना घडत घडतात. परिणामी मनुष्य आणि वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलीचे ढिगारे आहेत. यावर झाडेझूडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे आता येथे जंगली प्राण्यांनी आश्रय घेतला आहे. अनेकांना येथे जंगली प्राण्यांचे दर्शन घडले आहे. या परिसरात आता येथे वाघ आणि बिबट्या या हिंसक प्राण्यांनी आपले ठाण मांडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात चरायला गेलेल्या गावकर्यांच्या पाळीव जनावरांवर वाघ-बिबट्याने हल्ले करून जखमी केल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत.
या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे. त्यामुळे ग्रामस्थ दहशतीत आहे. दरम्यान, गुरुवारी याच परिसरातील पोडे यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्यात बैलाला दुखापत झाली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी विभागीय वन अधिकारी एल. सोनकुसरे, क्षेत्रीय अधिकारी राहुल कारेकर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावार यांच्यासह माना टेकडी येथील गावकर्यांची उपस्थिती होती. जखमी बैल मालकाला योग्य मोबदला देण्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना सांगितले.