चंद्रपूर- मनपाच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे अजून काही ठरले नाही. ही आघाडी होणार की नाही ही वेळच ठरवेल. पण जर नाही ठरले, तर राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणूक लढणार असल्याची घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक प्रवीण पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली. पक्षाच्या वतीने आता वॉर्डनिहाय बांधणी सुरू करण्यात आली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यापासून ही तयारी केली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी दमदार कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रवीण पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक प्रवीण पाटील हे आज चंद्रपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वॉर्ड अध्यक्ष व प्रभाग अध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाच्या कार्याबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. आम्ही पहिल्यांदाच आपल्या रणनितीत बदल केला आहे. यावेळी पक्षाच्या मोठ्या नेत्यांपासून नव्हे तर कार्यकर्त्यांपासून सुरुवात केली आहे. कोरोनाच्या काळात कार्यकर्त्यांनी उत्तम कार्य केले. लोकांची मदत केली आहे. हा जनसंपर्क आगामी मनपा निवडणुकीत नक्कीच कामात येणार आहे. त्यानूसारच आम्ही मोर्चेबांधणी करीत आहोत. येत्या काही दिवसांनी मनपाचा राजकीय आराखडा आम्ही आखणार आहोत. सध्या आमच्या दोन जागा मनपात आहेत. येत्या निवडणूकित ही संख्या 20 पर्यंत पोचणार आहे. महापौर हा आमच्या मर्जी शिवाय होणार नाही, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, प्रदेश महासचिव कादिर शेख, शहर महासचिव संभाजी खेवले यांची उपस्थिती होती.
हेही वाचा- आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ शकतो; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला