चंद्रपूर - शहरातील बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 18 जानेवारीला घडली होती. याप्रकरणी तपासात पोलिसांना एक डायरी सापडली आहे. या डायरीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित विद्यार्थ्यावर वसतीगृहातील त्याचेच सहकारी लैंगिक शोषण करत असल्याची धक्कादायक माहिती या डायरीतून समोर आली आहे. हा प्रकार मागील 1 वर्षापासून सुरू होता. या अत्याचाराला कंटाळूनच पीडित विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 11 विद्यार्थी आणि 3 वसतीगृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - विकृतीचा कळस! चंद्रपुरात तरुणावर 14 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, तरुणाची आत्महत्या
हॉस्टेलमधील सहकारी मित्र त्याचा लैंगिक, शारीरिक, मानसिक छळ करत होते. एवढेच काय तर वॉर्डनर आणि चौकीदाराने देखील त्याच्यावर अत्याचार केले. गेल्या एक वर्षांपासून या विद्यार्थ्यावर हा पाशवी अत्याचार केला जात होता. शेवटी या रोजच्या नरक यातनांना कंटाळून त्याने 18 जानेवारीला हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पीडित विद्यार्थ्याने हा सर्व घटनाक्रम एका डायरीत लिहून ठेवला होता. यात त्याच्यावर होणारा लैंगिक अत्याचार, शारीरिक-मानसिक शोषण, त्याचा आक्रोश, आगतिकता, जगण्याची धडपड मनाला सुन्न करणारी आहे. या विद्यार्थ्याने कुठल्या यातना भोगून आत्महत्येचा निर्णय घेतला असेल याचा अंदाज ही डायरी वाचल्यारून येईल.
हेही वाचा - सहकारी मित्रांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या
पीडित विद्यार्थ्याला नाचण्याची आवड होती. त्यातही तो महिलांचे नृत्य प्रकार त्याला जास्त आवडायचे. यावरून त्याला हॉस्टेलच्या सहकारी मित्रांकडून हीन वागणूक मिळण्यास सुरुवात झाली. तू नपूंसक आहेस. असे म्हणत त्याला अश्लील शिवीगाळ आणि त्याचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. कधी कधी त्याचे सामान फेकून देणे, त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, रात्र रात्रभर त्याच्याशी अश्लील चाळे करणे, हा प्रकार देखील सुरू झाला. या मुलांची तक्रार करतो म्हटलं तर ही मुलं संगनमत करून या मुलालाच दोषी ठरवत होते. हॉस्टेलचे कर्मचारी, अधिकारी देखील याच मुलांची बाजू घ्यायचे. त्यामुळे तक्रार करायची तरी कोणाकडे ही हतबलता या विद्यार्थ्यामध्ये आली.
दिवसेंदिवस हा प्रकार वाढत गेला आता ही मुलं निडर झाली. त्यांनी या मुलासोबत अश्लील चाळे करणे सुरू केले. त्याला रात्र रात्र झोपू दिल्या जात नव्हते. विरोध केला तर मारहाण करत असत. काही दिवसातच अश्लील चाळ्यांनी लैंगिग शोषणाचे रूप घेतले. आळीपाळीने त्याच्यावर अत्याचार होऊ लागला. सोबतच शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच होता. हे जीवन त्याला नरकासारखे वाटू लागले. या मुलांना भीती दाखवण्यासाठी त्याने आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. मात्र, या हैवान मुलांचा आत्मविश्वास दुणावला होता. तू मेला तर बारावीच्या टेन्शनने मेला असे आम्ही सांगू. अशी ही मूले त्याला म्हणत. त्याने हर प्रयत्न केले मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पीडित विद्यार्थ्याला बऱ्याचदा जीवन संपवून टाकावे वाटले पण दुसऱ्या बाजूला त्याचे फॅशन डिझायनर व्हायचे स्वप्न त्याला जिवंत राहण्याची प्रेरणा देत होते. मात्र, काही केल्या त्याच्या नरक यातना कमी झाल्या नाही. शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाने तो पूर्णपणे खचून गेला.
15 जानेवारीला त्याचा वाढदिवस होता. या रात्री देखील त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यापूर्वी त्याने आपल्या वडिलांना फोन केला. गरीब वडिलांनी फक्त बारावीची परीक्षा होऊ दे नंतर तुला दुसरीकडे खोली करून देतो म्हणून समजूत काढली खरी मात्र, या यातनांना कंटाळून अखेर पीडित विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या ग्रंथालयात गळफास लावून आपले जीवन संपवले. त्याने आपल्या डायरीत लिहून ठेवलेला घटनाक्रम कोणालाही हेलावून सोडणारा आहे.