चंद्रपूर - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटवरून चंद्रपूरला जात असलेल्या धावत्या कारला अचानक आग लागल्याने त्यातील प्रवासी थोडक्यात बचावले. चालकाने प्रसंगावधान दाखवून कार रोडच्या बाजूला पार्क केली. कार कापरासारखी जळत गेली. प्रवाशांनी आपला जीव वाचवत रोडच्या दुसऱ्या बाजूने जात अग्निशमन दलाला फोन लावला. आगीचा बंब पोहचेपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती.
यानंतर वरोरा नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. उर्वरित जळत्या कारला अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी पूर्णपणे विझवले. आगीचे कारण अजूनपर्यंत कळू शकले नाही. या घटनेमुळे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटवरून रविवारी चंद्रपूरला पाच लोक आपल्या कारने निघाले. वरोरा शहराजवळील येन्सा गावाजवळ या कारच्या बोनटमधून अचानक धूर निघायला लागला. चालकाने प्रसंगावधान राखत लगेच कार महामार्गाच्या कडेला उभी केली. त्यातील चार प्रवासी नरेंद्र हाडके , राजू सातपुते, सूर्यकांत कळमकर, पृथ्वीराज मेश्राम व चालक लगेच खाली उतरले. आणि पुढे मोठा अनर्थ टळला. लगेच कारने मोठा पेट घेतला आणि संपूर्ण कार कापरासारखी जळू लागली. याची माहिती वरोरा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. या दलाचे पथक लगेच इथे पोचले. त्यांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर आग विझविली. मात्र, या दरम्यान कार पूर्णपणे जळून गेली होती. ही घटना बघण्याचा अनेकांनी गर्दी केली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.