चंद्रपूर - भावाच्या कुटुंबाने जादूटोणा केला म्हणून कॅन्सर झाला, या संशयावरून मोठ्या भावाच्या कुटुंबाला लहान भावाच्या कुटुंबाने मारहाण केल्याची घटना भिवापूर येथे घडली. या प्रकरणात सहा लोकांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ह्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील वाढत्या अंधश्रद्धेच्या घटनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी अशीच घटना जिवती आणि नागभीड तालुक्यात घडली होती.
अंधश्रद्धेचा पगडा
अतिदुर्गम आणि मागास असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यावर अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे. यापूर्वी जिल्ह्यात नरबळीच्या घटनादेखील घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावी जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात मारहाण करण्यात आली. यात वृद्ध महिला आणि पुरुषांचा समावेश होता. ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ह्या घटनेची शाई वाळत नाही तोच नागभीड तालुक्यातील मिंडाळा गावात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह तिच्या दोन मुलांना मारहाण करण्यात आली होती. अशीच एक घटना चंद्रपूर शहरातील भिवापूर प्रभागात घडली.
भानामतीच्या संशयावरून घडला प्रकार
राम पडदेमवार हे कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते, मात्र पडदेमवार परिवारातील काहींनी हा भानामतीचा प्रकार आहे, कुणीतरी जादूटोणा केला असेल म्हणून राम हे कॅन्सरसारख्या आजाराने ग्रस्त झाले. त्यांच्या कुटुंबातील काहींनी मोठ्या भावातील कुटुंबाने जादूटोणा केल्याने कॅन्सर झाला, असा संशय व्यक्त करून मोठा भाऊ नारायण पडदेमवार यांच्या कुटुंबाला मारहाण केली. आशालू पडदेमवार, सिंनू रादंडी, सपना, नरसिंग पडदेमवार, मंनुबाई रादंडी, रवी आशावर, मंगेश पडदेमवार यांनी संगनमत करून पूजा नारायण पडदेमवार सहित वडील, भाऊ व बहिणीला बेदम मारहाण केली.
गुन्हा दाखल
या मारहाणीनंतर पूजा यांनी शहर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व आरोपींना ताब्यात घेतले व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.