चंद्रपूर - ऊर्जानगर-दुर्गापूर परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागील तीन वर्षात या परिसरात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. ही स्थिती रोखण्यासाठी वनविभागाला भविष्यात मोठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा दिवसेंदिवस ही स्थिती आणखी स्फोटक होत जाईल, ही मानव आणि वन्यजीवांसाठी धोक्याची बाब आहे.
दुर्गापूर परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला - चंद्रपूर शहराला लागूनच दुर्गापूर वसलेले आहे. त्याला लागूनच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र सुरू होते. या ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. मागील तीन वर्षांत या परिसरातील तब्बल 13 लोकांना वाघ आणि बिबट्याने आपले शिकार बनवले. मागील काही महिन्यात या परिसरात ह्या विषयाने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात ही स्थिती आणखी चिघळू शकते.
तारीख मृतकाचे नाव घटनास्थळ
1) २/०१/ २०१९ राजेश गुजलवार (वय २६) मौजा सिनाळा
2) ३/१०/२०१९ महेश ठाकरे (वय६५) सिनाळा, शेतशिवार
3) ३०/०४/२०२० लता सुरपाम (वय५५) आगझरी जंगल
4) २६/०८/२०२० लावण्या धांडेकर (वय५) ऊर्जानगर, पर्यावरण चौक
5)१७/०१/२०२१ मनोज दुर्योधन (वय ३५) वेकोली परिसर दुर्गापूर
6) १६/०२/२०२१ नरेश वामन सोनवने (वय ४०) पद्ममापूर, वेकोलि परिसर
7) २७/९/२०२१ जोगेश्वर रत्नपारखी (वय ७०) दुर्गापूर वेकोलि डंप्पीय यार्ड
8) ०९/१० २०२१ बबलू सिंग (वय २८) वेकोली दुर्गापूर परिसर
9) १२/११/२०२१ अनिल गुंजनकर (वय ४५) वेकोली दुर्गापूर परिसर
10) १७/०२/२०२२ भोजराज मेश्राम (वय ५८) ऊर्जानगर
11) १८/०२/२०२२ राज भडके (वय १६) वेकोलि वर्कशॉप, दुर्गापूर
12) ३०/०३/२०२२ प्रतिक बावणे (वय ०८) नेरी कोंडी, दुर्गापूर
13) ०२ /०५/ २०२२ लता मेश्राम (वय ४५) दुर्गापूर वॉर्ड क्रमांक- ३
अशी होत गेली स्फोटक परिस्थिती - वनविभागाच्या दुर्गापूर क्षेत्रात दुर्गापूर, उर्जानगर, नेरी, पद्मापूर, सीनाळा ही गावे येतात. उर्जानगर परिसरात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे तर दुर्गापूर, सीनाळा आणि पद्मापूर येथे वेकोलीच्या कोळसा खाणी आहेत. पूर्वी येथे घनदाट जंगल होते मात्र काळानुसार येथे बदल होत गेले. तसेच हा परिसर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्राला लागून आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात झाडीझुडुपे असल्याने आणि मोकाट जनावरे असल्याने वाघ आणि बिबट्याचा येथे मुक्तसंचार आहे. यापूर्वी उर्जानगर येथे एका 5 वर्षाच्या चिमुकलीला बिबट्या उचलून घेऊन गेला होता. तेव्हापासून वाघ आणि बिबट्याचा विषय चिंतेचा होऊन गेला होता. 17 फेब्रुवारी 2022 ला भोजराज मेश्राम हा 58 वर्षीय कामगार चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून परत येत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने त्याला ठार केले. या घटनेनंतर ठिणगी पडली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील या वाघाला तात्काळ जेरबंद करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.
दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर हे आमरण उपोषणाला बसले. जोवर नागरी वस्तीतील वाघ आणि बिबट्याला जेरबंद करण्यात येत नाही, तोवर आंदोलन सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी लावून धरली. स्थानिकांचा देखील त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. यानंतर वनविभाग, वेकोली आणि सिटीपीएस यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतले. यादरम्यान वाघाला जेरबंद करण्यात आले. यानंतर 30 मार्चला दुर्गापूर येथे प्रतीक बावणे हा आठ वर्षीय मुलगा आपल्या आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आईसोबत आला असता, त्याला बिबट्याने उचलून नेले. यानंतर संतप्त झालेल्या भटारकर यांनी वेकोली कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या घटनेची शाई वाळते न वाळते तोच 2 जूनला गीता मेश्राम या महिलेला बिबट्याने ठार केले. त्यामुळे हा दुसरा बिबट असल्याचे समोर आले. 10 मे रोजी दुर्गापूरातील वॉर्ड क्रमांक १ येथील जगजीवन पोप्यालवार यांची मुलगी आराक्षा घरी जेवण करत असताना (वय ३) बिबट्याने तिच्यावर झडप घातली.
यावेळी तिची आई धावत आली आणि बिबट्याला तिने काठीने झोडपून काढले. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. यात मुलगी वाचली. मात्र या घटनेनंतर जनक्षोभ उसळून आला. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी वनविभागाच्या पथकालाच तब्बल तीन तास जेरबंद केले. शेवटी मुख्य वनसंरक्षकांनी बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आणि वनकर्मचाऱ्यांची नागरिकांच्या संतापातून सुटका झाली. हा मानव-वन्यजीव संघर्षाचा कळस आहे. अखेर आज सकाळी चार वाजता या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. मात्र भविष्यात ही स्थिती आणखी चिघळू शकते.
सामूहिक प्रयत्नांशिवाय मानव-वन्यजीव संघर्ष टळणार नाही - जिल्हा प्रशासन, वनविभाग, वेकोली प्रशासन, महाऔष्णिक वीज केंद्र या सर्वांनी मिळून जर कृती केली तरच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याची शक्यता आहे, अन्यथा हा प्रश्न दिवसांगणिक चिघळत जाणार असे, मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक तसेच ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे संस्थापक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले. शहराच्या पूर्वोत्तर भागात जाळीची सुरक्षाभिंत उभारावी लागेल, सीएसआर निधीतून हे सहज शक्य आहे. दुर्गापूर परिसरात होत असलेले मानवी अतिक्रमण थांबवावे लागेल. त्यामुळे निष्पाप नागरिक आणि हिंस्र प्राण्यांचाही जीव वाचू शकेल असे मतही चोपणे यांनी व्यक्त केले.