चंद्रपूर - भरारी पथकाने दोन दिवसापूर्वी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले होते. जप्ती केलेला ट्रक कोरपना तहसील कार्यालय परिसरात उभा होता. मात्र, सकाळी हा ट्रक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. मंडळ अधिकाऱ्यांनी चालक आणि मालकाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी घेतलेल्या शोधात हा ट्रक आदिलाबाद येथील ट्रक मालकाच्या घरासमोर उभा होता. दरम्यान, पोलिसांनी चालक नरेंद्र पड्डा यास ताब्यात घेतले असून मालक फरार असल्याची माहीती मिळाली आहे.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : रतनलाल यांना दिला हुतात्मा दर्जा, कुटुंबीयांना 1 कोटींची मदत तर पत्नीला नोकरीची घोषणा
कोरपना तालुक्यातील वाळूघाटावर चोरांचा सुळसूळाट आहे. वाळू चोरांना महसूल विभाग पोटाशी घेत असल्याचा आरोप होत असताना भरारी पथकाने वाळूची वाहतूक करणारा ट्रक पकडला. तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, तलाठी मारोती मडावी, प्रकाश कम्मलवार यांनी ट्रक जप्तीची कारवाई केली. जप्ती केलेला ट्रक तहसील कार्यालय परिसरात उभा होता. सकाळी तहसील कर्मचारी कार्यालयात आले असता त्यांना ट्रक दिसला नाही. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. या गंभीर प्रकाराची तक्रार मंडळ अधिकाऱ्यांनी कोरपना पोलीस ठाण्याला केली.
तक्रारीत ट्रक चालक आणि मालकावर संशय घेण्यात आला. ट्रकचा शोध घेणाऱ्या पोलिसांना आदिलाबाद येथे ट्रक असल्याचा सूगावा लागला. पोलिसांनी आदिलाबाद गाठले असता ट्रक मालकाचा घरासमोरच ट्रक उभा होता. पोलिसांनी नरेंद्र पड्डा या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. तर मालक फरार असल्याची माहीती आहे. ठाणेदार अरुण गुरनूले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सूरू आहे.
हेही वाचा - धक्कादायक! लग्नाच्या अवघ्या दोन आठवड्यापूर्वीच डॉक्टर तरुणीची आत्महत्या