चंद्रपूर - आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतुन स्पर्धा परीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी हे आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. व्हिडिओमुळे झालेल्या प्रसिद्धीच्या जोरावर ते नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे ठाकले आहेत. त्यांनी अचानक राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नांची उत्तरे कराळे सरांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहेत. ते चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
उमेदवार असल्याची व्हायरल झाली होती पोस्ट
स्पर्धा परीक्षेसाठीचे अनेक क्लिष्ट विषय सहज आणि सोप्या पध्दतीने मांडण्याचा कलेत त्यांचा हातखंडा आहे. त्यावर अस्सल वऱ्हाडी भाषेची फोडणी. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कराळे गुरुजींचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. यानंतरच्या त्यांच्या व्हिडिओंना लाखोंच्या घरात लाइक्स यायला लागले आणि ते घराघरात पोहोचले. याच दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. तेव्हा कोणीतरी कराळे गुरुजींचा फोटो टाकून ते पदवीधर मतदार संघाचे उमेदवार म्हणून पोस्ट व्हायरल केली. त्यानंतर कराळे गुरुजींनी आपण कुठलीही निवडणूक लढत नसून कोणीतरी ही पोस्ट व्हायरल केल्याचे स्पष्ट केले. मात्र, लोकांनी त्यांनी ही निवडणूक लढवावी,असा आग्रह धरला. त्यानंतर त्यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ते विद्यार्थी, शिक्षक व बेरोजगार युवक आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
विजयाबद्दल आशादायी मात्र आत्मविश्वास नाही
मिळालेल्या लोकप्रियतेचे रूपांतर निवडणूकीच्या विजयात होईल का या प्रश्नावर कराळे गुरुजी यांनी आपली भूमिका मांडली. आपण प्रचार दौऱ्यावर असता पदवीधर मतदारांशी संवाद साधतो. यावेळी त्यांच्याकडुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, हे राजकारण आहे आणि त्यात काहीही होऊ शकते. माझ्या हातात जे प्रयत्न आहेत ते आपण प्रामाणिकपणे करीत आहोत. ते आपले कर्तव्यच आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - वर्षभरापूर्वी तुम्हाला धुतले ते कमी झाले काय? भाजपच्या टिकेला शिवसेनेचे सणसणीत उत्तर
हेही वाचा - भाजप सरकारच्या काळा सुशिक्षितांवर बेरोजगारीची कुऱ्हाड - जयंत पाटील