चंद्रपूर - नागभीड तालुक्यातील तळोधी-बाळापूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री कारमधून हे दोघेही नागभीडकडे जात होते. त्यावेळी जनकापूर नाक्याजवळ धानाच्या पोत्यांनी भरलेला ओव्हरलोड ट्रक कारवर उलटला. ज्यात या शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. दादाराम फटाले आणि गुलाबराव कामडी, अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा... मुंबईत कारचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार
शुक्रवारी रात्री हे दोघेही जण जेवण करण्यासाठी कारने नागभीडकडे जात होते. सध्या नागभीडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यांची कार जनकापूर नाक्याजवळ आली होती. त्यावेळी एक धानाच्या पोत्यांनी भरलेला ओव्हरलोड ट्रक त्यांच्या बाजूला होता. रस्ता बरोबर नसल्याने ट्रकचे संतुलन बिघडले आणि तो थेट बाजूच्या कारवर कोसळला. यात या प्राध्यापकाचा आणि प्राचार्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. ट्रक आणि पोत्यांच्या ढिगाऱ्यामुळे कारमधील या दोघांनाही बाहेर काढायला तब्बल तीन तास लागले.
हेही वाचा... राजस्थानमध्ये ट्रेलर-पिकअपचा भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू
वाहतुक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. ओव्हरलोड वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यातच अनेक ठिकाणी विकासाच्या नावावर जी रस्त्याची कामे सुरू आहेत, तिथे नियम धाब्यावर बसवले जातात. काम सुरू असल्याचे फलक किंवा चिन्ह लावले जात नाही. त्यामुळे अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
हेही वाचा... तामिळनाडूत भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; बिहारमधील चार कामगारांचा समावेश