चंद्रपूर - मेडिकल कॉलेजचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटी कंपनीने काही कामगारांना कामावरून काढून टाकले. या कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नव्हता. त्यांना जादा वेळ काम (OT) केल्याचे पैसेही नियमित दिले जात नव्हते. पैशांची मागणी केली असता त्यांना थेट कामावरून काढून टाकले, असा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. याविरोधात आज प्रहार संघटनेने कामगारांना घेऊन आंदोलन केले. जोवर कंपनी कामगारांना कामावर घेत नाहीत तोवर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.
सहायक आयुक्तांचे कंपनीला आदेश
चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या बांधकामाचे संपूर्ण कंत्राट शापुर्जी पालोंजी कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. त्याअंतर्गत पेटी कंत्राट आर. सी. जैन या कंपनीला देण्यात आले. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही. त्यांच्याकडून १२ तासांपेक्षा जास्त काम करून घेतले जात. जेवणाच्या वेळाचे पैसे कापले जात. तशी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाकडे प्राप्त झाली. ही बाब घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त पाटणकर यांची भेट घेण्यात आली. त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर पीडित कामगारांचा सर्व मोबदला देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.
कंपनकीकडून कामगारांची पिळवणूक
त्यानुसार कंपनीला कामगारांचा सर्व मोबदला द्यावा लागला. हाच राग मनात धरुन कुठलेही कारण नसताना तुमचे पैसे घ्या व काम सोडा नाहीतर पैसे सोडा, अशी अट ठेवून कामगारांना लॉकडाऊन काळात कामावरून कमी करण्यात आले. याविरोधात आज प्रहार संघटनेने कामगारांना घेऊन आंदोलन केले.
प्रहार संघटनेचा कंपनीला इशारा
या प्रकाराच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. जोवर कामगारांना पूर्ववत केले जात नाही, तोवर हे आंदोलन सुरू राहणार, असा इशारा यावेळी देण्यात आला. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष महेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
हेही वाचा - PM-Kisan Scheme: पंतप्रधान येत्या 9 ऑगस्टला पीएम -किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित करणार