चंद्रपूर - जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली असली तरी अजूनही कोंबड्याचा बाजार सुरू असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करत 9 गड्यांसह चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई नागभीड तालुक्यातील कोरंबी येथे करण्यात आली आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अजूनही काही ठिकाणी याबाबत लोक पाहिजे तेवढे गंभीर नसल्याचे समोर येत आहे. सुदैवाने चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मात्र, संचारबंदीचे कडक पालन केले नाही तर याउलट स्थिती निर्माण होऊ शकते. काही लोकांचे अजूनही घराबाहेर निघणे सुरूच आहे. नागभीड तालुक्यातील कोरंबी या गावात तर चक्क कोंबड्याचा बाजार भरवला गेला. कोंबडयाची जीवघेणी लढाई बघण्यासाठी अनेकांनी येथे हजेरी लावली. संचारबंदीला ठेंगा दाखवत हे सर्व सुरू होते. याची माहिती पोलीस निरीक्षक गोतमारे यांना मिळाली. यावेळी धाड टाकली असता 4 लोकांना अटक करण्यात आली. उर्वरित पळून जाण्यास यशस्वी झाले. यावेळी घटनास्थळी नऊ वाहने आणि 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.