चंद्रपूर - जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे भानामतीच्या संशयावरून सात वृद्ध लोकांना दोराने बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. पुरोगामी विचार जोपासणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना होती. मात्र, या घटनेला गांभीर्याने घेण्याची तसदी येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घेतली नाही. इतकी मोठी घटना घडली असताना पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पीडितांची भेट घेतली नाही. यावर थातुरमातुर कारवाई करण्यात आली असून पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे. हा संपूर्ण सुनियोजित कट असून पीडितांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न होता, असा दावाही त्यांनी केला आहे. यावेळी संबंधित आरोपींना अटक करण्याची मागणीही केदार यांनी केली आहे. जिवती येथील वणी गावाला शनिवारी (दि. 29 ऑगस्ट) भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
21 ऑगस्टला जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथील सात लोकांना जादूटोणा केल्याच्या संशयावरुन सात जणांना भर चौकात दोराने बांधून क्रूरपणे मारहाण करण्यात आली. यात वृद्ध महिला आणि पुरुषांचा देखील समावेश होता. ही घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी पीडित लोकांची भेट घेतली तसेच त्या गावात जाऊन तेथील हकीकत जाणून घेतली. यानंतर त्यांनी शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
केदार यांनी केलेले आरोप
जातीय द्वेषातून ही घटना घडली आहे, असा आरोप त्यांनी केला. शांताबाई कांबळे ही महिला आणि तिचे कुटुंब गावातील जातीयवादी लोकांच्या निषाणावर होती. ही महिला गावात बाळंतपणाचे काम करायची. गावात कोणाचाही मृत्यू झाला तर हिच्यामुळे मरण पावला, असे सांगून मृतकांच्या कुटुंबातील लोकांना या महिलेविरोधात भडकविले जात होते. घटनेच्या आदल्या दिवशी गावात सवारी काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी गावातील मोक्याच्या ठिकाणी गावकरी गोळा झाले. येथे तीन महिलांच्या अंगात देवी संचारली. गावातील काही लोकांनी करणी केली, असे सांगितले. या महिलांनी शांताबाई कांबळे आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची नावे घेतली. या सर्वांना चौकात बोलाविण्यात आले आणि त्यांना दोराने बांधून जबर मारहाण करण्यात आली. फाशी लागेपर्यंत शांताबाईला फास लावल्या गेला. वृद्ध एकनाथ हुकेंचा हात मोडला. अनिल सोनकांबळे याला याची माहिती मिळाली. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या गाडीत तो गावात गेला असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. सुदैवाने पोलिसांच्या मदतीने तो वाचला. या घटनेचे मास्टरमाईंड गावात मोकाट फिरत आहेत आणि जे प्रत्यक्ष हजर नव्हते अशांना अटक केली जात आहे. घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी गुन्हे नोंदविले. काँग्रेस आमदार धोटे प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत. आरोपींच्या घरी जाऊन ते भेट देत आहेत मात्र ते पीडितांना भेटले नाहीत, असे आरोप केदार यांनी केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांनी या पीडितांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्याची तसदीही घेतली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनीही घटनेची गंभीरता लक्षात घेऊन घटनास्थळी गेले नाहीत. हा प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली पाहिजे अन्यथा याविरोधात मोठे आंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी केदार यांनी दिला.
या आहेत मागण्या
- या घटनेत सहभाग असणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
- पीडितांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावे
- पीडित कुटुंबाचे सामाजिक आयुष्य उधवस्त झाले आहे, त्यांना 1 कोटीची मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे
- आरोपी गावगुंडांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी
- सामाजिक न्याय विभाग व राज्यसरकारने अंधश्रद्धेचे व सामाजिक निरक्षरतचे रेड बेल्ट आखावे
- त्या भागाचे सामाजिकस्तर व अंधश्रद्धामुक्त चंद्रपूर करण्यासाठी कार्यकर्त्यांना समतादुतांना मानधन देऊन मोहीम राबवावी
- आरोपींना पाठीशी घालणाऱ्या व घटना दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाणेदार व उप-अधीक्षक यांचे तात्काळ निलंबन करावे
अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केली.
काय आहे प्रकार..?
21 व्या शतकात आजही समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. नरबळीचा प्रयत्न, अंधश्रद्धेतून लोकांना सामूहिक मारहाण असे प्रकारही चंद्रपूर जिल्ह्यात घडले आहेत. याचा कळस जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात दिसून आला. वणी बुद्रुक या गावात अंधश्रद्धेचा पगडा आहे. शनिवारी (दि. 21 ऑगस्ट) काही महिलांच्या अंगात आले. त्यांनी पीडित लोकांची नावे सांगितली. यानंतर गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी गावातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत 7 जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमध्ये शांताबाई भगवान कांबळे (53), साहेबराव एकनाथ हुके (48), धम्मशिला सुधाकर हूके (38), पंचफुला शिवराज हुके (55), प्रयागबाई एका जबर जखमी झाले. या प्रकरणात 13 जणांना जिवती पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी घडली
हेही वाचा - पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोण्याच्या संशयावरून ७ जणांना बांधून मारहाण, या गावात तणावाचे वातावरण