चिमूर - चिमूर तालुक्यातील भिलगाव (रिठ) शेत शिवारातील शेतकरी संजय कामडी यांनी स्वतःच्या धान पिकावर जहाल तणनाशक टु फोर डी फवारले होते. मात्र, त्यामुळे शेजारचे शेतकरी राजु कामडी याचे अडीच एकर आणि संभाजी भलमे याचे दीड एकर कापूस पिकाचे नुकसान झाले होते. याबाबतचे वृत्त ३१ जुलैला ई-टीव्ही भारतने प्रसारित केले होते. त्याची दखल घेऊन बाधित पिकाचा तालुका कृषी तक्रार निवारण समीतीने प्रत्यक्ष पाहणी करूण पंचनामा केला आहे.
शेत जमिनीतील तणांचा नाश करण्यासाठी टू फोर डी या तणनाशकाचा वापर केला जातो. मात्र, या औषधांचा कापूस पिकावर लगेच परिणाम होतो, आणि पिकाची पाने करपून जातात, पीक हातचे वाया जाते. याची माहिती असताना देखील शेतकरी संजय कामडी यांनी स्वतःच्या शेतात या तणनाशकाची फवारणी केली. परिणामी आजूबाजूच्या परिसरातील कापूस पिकावर याचा परिणाम होऊन शेतकऱ्याचे नुकसान झाले. या प्रकरणी शेतकऱ्यांनी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली. याबाबतचे वृत ई टीव्ही भारतने प्रसिद्ध केल्यानंतर तालुका कृषी तक्रार निवारण समीतीने नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पंचनामा केला.
कापूस पीक पुनर्जीवित करण्यासाठी उपाययोजना
पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील संशोधक डॉ. विनोद नागदेवते, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, तांत्रीक कृषी अधिकारी प्रकाश गोंधळी, कृषी सहाय्यक पि.सदगर यांच्या समीतीने संबधित शेतकऱ्यांना बाधित कापुस पिकास पुनर्जीवित करण्याकरीता उपाययोजना सुचविल्या.
मात्र, प्रथमदर्शनी धानावर तणनाशकाच्या फवारणीने कापुस पिकाला बाधा झाल्याचे दिसुन आले. ह्या बाधित रोपांना पाण्याचे स्प्रे, बाधीत पाने खुळणे, युरीया १५ लिटरला १५० ग्रॅम इत्यादींची फवारणी केल्यास ही रोपे पुनर्जिवित होऊ शकतात, असे मत डॉ.विनोद नागदेवते, संशोधक -पिकेव्ही कृषी विज्ञान केंद्र -सिंदेवाही यांनी व्यक्त केले.
तणनाशकाचा पिकांवर परिणाम होत असल्याचे लक्षात येताच चिमूर तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांनी टु फोर डी तणनाशक विक्री थांबवुन त्याऐवजी इतर तननाशक औषध योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे वापरण्याच्या सुचना देऊन विकावे, असे पत्र दिले असल्याची माहीती ज्ञानदेव तिखे ,तालुका कृषी अधिकारी , चिमूर यांनी दिली .