चंद्रपूर - कोरोनाशी संबंधित पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे लोकांमध्ये इतकी दहशत पसरली आहे की माणूस माणसापासून दूर झाला आहे. असाच अनुभव घुग्गुस येथील एका कुटुंबाला आला असून त्यांना कोरोना संशयित म्हणत त्यांच्या सभोवतालचा संपूर्ण परिसरच सॅनिटाइझ करण्यात आला. त्यांना कोरोनाग्रस्त असल्यासारखे वागवण्यात येत आहे. यामुळे हे कुटुंब प्रचंड दहशत आणि तणावाखाली आहे.
घुग्गुस येथे वेकोलीची वसाहत आहे. जिथे हे कुटुंब राहते. त्यांचा मुलगा हा पंजाब येथील एका विद्यापीठात एरो स्पेस इंजिनिअरिंग या विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा तरुण 20 मार्चलाच स्वगावी परतला. याची रीतसर प्रशासनाला माहिती देऊन तो होम क्वरंटाईन झाला. त्याला आधीपासूनच खोकला होता. यासाठी तो हळदीचा काढा पीत होता. मात्र, यामुळे उलट त्याचा त्रास वाढला आणि त्याला श्वास घेणेही जड होऊ लागले. एक एप्रिलला रात्री त्याला वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात नेण्यात आले. त्याला बघून डॉक्टरही घाबरले. त्याला इंजेक्शन दिले मात्र सुधारणा होत नसल्याने त्याने जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची विनंती केली. मात्र, रुग्णवाहिका चालकाने त्याला नकार दिला. अखेर खूप विनवण्या करुन तसेच इंधनाचे पैसे देण्याचे मान्य केल्यावर तो तयार झाला. त्याला रात्रभर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याच्यात कोरोनाचे कुठलेही लक्षण आढळले नाही. त्याच्या घशाला संसर्ग झाला होता. यासाठी डॉक्टरांनी औषधे दिली आणि परत पाठविले.
मात्र, याच दरम्यान घुग्गुस येथे कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याची अफवा पसरली. यामुळे ह्या तरुणांकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जात होते. या तरुणाचे वडील वेकोलीत कार्यरत आहेत. वेकोली प्रशासनाला ही माहिती मिळताच, त्याचे वडिल काम करत असलेला परिसर संपूर्ण निर्जंतुक करण्यात आला. एवढेच नव्हे तर त्यांना कामावर न येण्यासाठी पुढील दहा दिवस रजा देण्यात आली.
या कामगार वसाहतीचे देखील निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनाचे कुठलेही लक्षण नसताना या कुटुंबाला अपराधी दृष्टीने बघण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी कोरोनाग्रस्तांशी किंवा संशयीतांशी भेदभाव करू, नये असे आवाहन केले होते. मात्र, तरीही असा प्रकार अनेक ठिकाणी होत आहे. यामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीत आहे. समोर येऊन आपली व्यथा मांडावी इतके धाडसही त्यांच्यात उरले नाही.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याशी संपर्क साधला असता आपण या प्रकारची गंभीरतेने शहानिशा करून योग्य कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - अखेर दिवे लावलेच ! पंतप्रधानांचे आवाहन; एकजुटीचे दिवे लावण्याचा नादात दोन घरे पेटली