चंद्रपूर - जनसामान्यांशी निगडित असणाऱ्या वस्तूंची दिवसेंदिवस किंमत वाढत आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. याविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारला बेश्रमाची फुले पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.
केंद्र सरकार दिवसेंदिवस घरगुती वापरासाठीचे गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढवीत आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आधीच सामान्य लोक कोरोना काळात जनता त्रस्त असताना केंद्र सरकार ने आणखी 25 रुपयेने गॅस दरवाढ केली. एकीकडे मोदी सरकार जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवते तर दुसरीकडे गॅस दरात सारखी वाढ करून जनतेला आर्थिक संकटात लोटत आहे. या दरवाढीचा निषेध म्हणून चंद्रपूर येथील वरोरा नाका चौकात चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचेचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांच्या नेतृवात आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच जनतेला महागाईच्या संकटात टाकणाऱ्या मोदी सरकारला बेशरमची फुलं चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोस्टाने पाठविण्यात आली. या आंदोलनात सुनील काळे, सुरेश रामगुंडे, शहर महिला अध्यक्ष ज्योती रंगारी, शहर महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी यांची उपस्थिती होती. याचप्रमाणे हे आंदोलन जटपुरा गेट आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.