चिमूर - जगभरात कोरोना विषाणूच्या प्रकोपाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपल्या देशातील व राज्यातील अनेक पर्यटन स्थळे व मंदीरे कोरोनामुळे पर्यटक तथा भक्तांकरीता बंद आहेत. चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा व विरांगणा मुक्ताई मंदीर सुद्धा कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता पर्यटक व भक्तांकरीता बंद ठेवण्याचा निर्णय विरांगणा मुक्ताई सेवा ट्रस्ट ग्राम समितीने घेतला आहे.
चंद्रपूर व नजीकच्या जिल्हयात पावसाळ्यामधील आवडीचे पर्यटनस्थळ म्हणुन मुक्ताई प्रसिद्ध आहे. आल्हाददायक धबधबा, निसर्ग सौंदर्याचा आंनद लुटण्याच्या इच्छेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता मनाला मुरड घालावी लागणार आहे. विरांगणा मुक्ताई सेवा ट्रस्ट ग्राम समितीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याकरीता तसेच जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने पेरजागड मुक्ताई धबधबा पर्यटन परीसर पर्यटक व भक्तांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
हेही वाचा - कोरोना लढाईत धारावीचे रोल मॉडेल संपूर्ण देशाला दिशा दाखविणारे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रशासनाच्या वतीने पर्यटक व वाहनाना अटकाव करण्याकरीता बॅरीकेट लावलेल्या आहेत. तर सेवा ट्रस्टच्या वतीने पर्यटकांना प्रवेश बंदी असल्याचे सूचणा फलक लावलेले आहेत. या नंतरही कुणी पर्यटक जोर जबरदस्तीने मुक्ताई परीसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर ट्रस्ट व प्रशासनाकडून दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन ट्रस्टने केले आहे.