चंद्रपूर - विशेष न्यायालये शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या ( Shakti Law 2020 ) विवक्षित अपराधांसाठी विधेयक 2020 यावरील दोन्ही सभागृहांची संयुक्त समितीच्या निमंत्रित सदस्यपदी आमदार प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती ( Pratibha Dhanorkar Shakti Law Joint Committee Member ) करण्यात आली आहे. ही नियुक्ती आज उपसचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय शिवदर्शन साठे यांनी केली आहे. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा यासाठी सर्वप्रथम मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनीच केली होती.
प्रतिभा धानोरकरांनी केली होती शक्ती कायद्याची मागणी -
प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा कायदा समजून घेण्यासाठी आंध्रप्रदेशचा दौरा केला. त्यानुसार आता महाराष्ट्रातही हा कायदा लागू होणार आहे. या माध्यमातून महिलांना त्वरित न्याय आणि त्यांच्या तक्रारींचा निर्वाळा होण्यास गती मिळणार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात कडक कायदा व्हावा यासाठी शक्ती कायद्याची मागणी सातत्याने होत होती. वर्धा येथील जळीत कांड झाल्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी विधानसभेत या कायद्याची मागणी लावून धरली होती. तसेच त्याचा पाठपुरावा देखील केला. अखेर हा कायदा अस्तित्वात आल्याने प्रतिभा धानोरकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना या समितीच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहे. विधान भवनाच्या विधानपरिषद व विधानसभेच्या दोन्ही सभागृहाने गठीत केलेल्या समितीवर आमदार प्रतिभा धानोरकर यांची निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.