चंद्रपूर - कोरोनाविरोधात लढाईसाठी केंद्र सरकारने जो निधी महाराष्ट्राला दिला, त्यातूनच राज्याचे सर्व नियोजन करण्यात आले. त्यात राज्य सरकारने एक रुपयाही अधिकचा दिला नाही, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र फडणवीस यांचा हा आरोप धादांत खोटा आहे. कोरोनासाठी केंद्र सरकारने एक छदामही वेगळा दिला नाही. जो निधी दिला, तो दरवर्षी जो नियमितपणे दिला जातो, तोच आहे. त्यामुळे फडणवीस हे राज्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा पलटवार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने 1,175 कोटींचा निधी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला असे ते म्हणाले. त्यातूनच मजुरांना अन्न, आरोग्य व्यवस्था करण्यात आली. म्हणूनच या खात्याचा मंत्री म्हणून त्यावर मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. केंद्र सरकार जो दरवर्षी निधी देतो तोच निधी यावर्षी देण्यात आला. यामध्ये 75 टक्के केंद्र आणि 25 राज्य असे नियोजन आहे.
एकूण 3 हजार 200 कोटींच्या निधीतून पहिला हफ्ता केंद्राने दिला. 1,611 कोटी हा निधी आहे. हा निधी या परिस्थितीत खर्च करण्याचे नियोजन केंद्राकडे मागविण्यात आले होते. मात्र पंधरा दिवस केंद्राने कुठलेही उत्तर दिले नाही. यानंतर एकूण निधीच्या 35 टक्के निधी हा कोरोनाच्या उपाययोजना करण्यात लावावा असे सांगितले. म्हणजेच केंद्राने एक छदामही अधिकचा दिला नाही. असे असतानाही देवेंद्र फडणवीस हे जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.