चंद्रपूर : जिल्ह्यातील पूरस्थिती (MH Chandrapur Flood Situation) पूर्ववत होत असतानाच मागील चोवीस तासात मुसळधार पावसाची (Heavy Rains) नोंद झाल्याने, पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील मूल, सावली येथे अतिवृष्टी झाली, त्याचा मोठा फटका चिमूर तालुक्याला बसला आहे. चिमूर शहरासह तालुक्यातील अनेक गावाला पुराने वेढले असून बचाव कार्य सुरू आहे. सध्या तालुक्यातील स्थिती सामान्य होत असली तरी पुढील चोवीस तास धोक्याचे असणार आहे. इरई धरणाचे (Erai Dam) सातही दारं दीड मीटरने उघडण्यात आले आहे. तसेच निम्न वर्धा आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. सोबत नजीकच्या तेलंगणा राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जर पुढील चोवीस तासांत मुसळधार पाऊस कोसळला तर याचा मोठा फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसणार आहे.
नद्यांनी गाठली धोक्याची पातळी : जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. वर्धा- वैनगंगा- उमा नद्यांनी पातळी ओलांडली आहे. शहरालगतचे इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे दीड मिटरने उघडले आहे. यामुळे इरई नदीची पाणीपातळी वाढून शहराच्या सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पुराचे ताजे संकट चिमूर शहरातुन पुढे आले आहे. संततधार पाऊस आणि उमा नदीने पात्र सोडल्याने चिमूर शहराच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले. टेलिफोन एक्सचेंज, तहसील कार्यालय, माणिकनगर या भागात पुराची तीव्रता अधिक आहे. चिमूर ते वरोरा आणि चिमूर ते कांपा हे मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले आहेत. 41 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
अनेक मार्ग बंद : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने ही वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, आता हे पाणी ओसरले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग अद्याप बंद ठेवण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर-गडचिरोली, घूघुस-गडचांदूर येथे पुलाचे पाणी ओसरले असले तरी, तूर्तास हे पूल बंद ठेवण्यात आले आहे. याची पाहणी केल्यावर हे पूल सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Yavatmal Monsoon Updates : यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे थैमान; अनेक गावांना पुराने वेढले