चंद्रपूर - तुम्ही घरी पशु-पक्ष्यांचे मांस खाता, गायीचे-डुकरांचे मांस खाता असे म्हणत आदिवासी समाजाला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या कुसुंबी या गावातील हा लांच्छनास्पद प्रकार घडला आहे. तर, माणिकगड सिमेंट कंपनीचे अधिकारी या आदिवासींना मंदिरात येण्यास मज्जाव करीत आहेत.
21 व्या शतकात देखील केवळ जातीच्या नावावर भेदभाव केला जातो. महाराष्ट्र राज्य, ज्याला पुरोगामी समजले जाते त्या राज्यात असा प्रकार घडणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. माणिकगड सिमेंट कंपनीची कुसुंबी येथे चुनखडी खाण आहे. या कंपनीची कॉलोनी नोकारी शिवारातील आदिवासींच्या कृषक जमिनीवर आहे. मौजा-कुसूंबी येथे हनुमान मंदिर होते. येथील आदिवासी वर्षानुवर्षे या मंदिरात पूजाअर्चा करीत होते. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हनुमानाची मूर्ती हटवून कॉलनीतील मंदिरात ठेवली आणि मंदिराला कुलूप ठोकले. यानंतर कुसुंबी येथील आदिवासींना मंदिर प्रवेशास बंदी घालण्यात आली. याबाबत लोकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून आपल्याला मंदिर प्रवेश देण्यात यावा, अशी वारंवार मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. तुम्ही मांस खाता. डुक्कर, गायींचे मांस खाता यामुळे आमच्या मंदिराला विटाळ होईल, असे सांगत त्यांना हाकलून देण्यात आले.
सध्या श्रावण मास सुरू आहे, पोळ्याचा सणही काही दिवसांवर आहे. अशावेळी आपण पारंपरिक पूजाअर्चा कुठे करायची, असा प्रश्न येथील आदिवासींसमोर उभा ठाकला आहे. याबाबतची तक्रार येथील आदिवासींनी प्रशासनाकडेही केली. मात्र, मंदिराकडे जाणारे गेट अद्याप उघडले गेले नाहीत. त्यामुळे प्रशासनही कंपनीच्या दबावाखाली काम करत आहे का? असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. यामुळे येथील आदिवासींमध्ये तणावाचे वातावरण आहे. आम्हाला आमच्या मंदिरात जाऊ द्यावं अन्यथा आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाऊराव कन्नाके, केशव कुडमेथे, आनंदराव मेश्राम, बापुराव आत्रम यांनी दिला आहे.