चंद्रपूर: हा माल चंद्रपूर शहरातील दारूचा व्यवसाय करणाऱ्या एका मोठ्या व्यापाऱ्याचा असल्याची माहिती आहे. आपल्या टोपण नावाने या व्यवसायात परिचित असलेल्या या दारू विक्रेत्याने जिल्ह्यातील अवैध दारू पुरवठ्याच्या व्यवसायात चांगलाच जम बसवलेला आहे. यापूर्वी जिल्ह्यात दारुबंदी असताना हाच व्यावसायिक जिल्ह्यात अवैध दारू तस्करी करायचा. तपासात पोलीस हा माल ज्याचा आहे, त्याचा छडा लावून कारवाई करतोय का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अशी झाली कारवाई: आजपासून होळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. या काळात दारूची सर्वोच्च मागणी असते. अशावेळे दारूची तस्करी होऊ नये यासाठी पोलीस विभागाने कारवाईची मोहीम राबवने सुरू केले आहे. काल रविवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रकाश बलकी यांच्या नेतृत्वात मूल मार्गावर एक गाडी पकडली. यात साडे पाच लाखांचा मुद्देमाल पकडण्यात आला. एमएच 34 बीझेड 3157 या चार चाकी वाहनातून दारूची तस्करी केली जात होती. यात वाहनचालक आरोपी अरविंद श्यामराव नेवलकर याला अटक करण्यात आली. गाडीतून देशी दारूच्या 75 पेट्या तर ओसी कंपनीचे 45 नग बंपर सापडले.
काय म्हणाले पोलीस प्रशासन? यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने हा तपास रामनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. पोलीस उपनिरीक्षक विनोद गुरूले यांच्याकडे तपासाची सूत्रे आहेत. त्यांच्याशी संपर्क केला असता आपण याचा तपास करीत असून हा माल कुणाचा आहे, तो कुठे जात होता, याची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढे नेमके काय होते, त्या मोठ्या व्यावसायिकापर्यंत कायद्याचे हात पोचू शकतात काय याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
दारुबंदीत अवैध व्यावसायाची चांदी 1 एप्रिल 2015 ला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन संपूर्ण जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील दारूचा व्यवसाय अचानक ठप्प पडला. मात्र अनेकांसाठी ही संधी होती. यातल्याचपैकी एक हा व्यावसायिक असल्याची माहिती आहे. यासाठी एक वेगळीच यंत्रणा या व्यवसायायिकाने तयार केली. पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग आणि इतरांशी हातमिळवणी करत या व्यवसायिकाने अवैध दारुतस्करी व्यवसायात जम बसवला आणि यात कोट्यवधीची माया जमवली.
दारुबंदी उठली अन... ऑगस्ट 2021 पासून दारुबंदी उठली. यानंतर पुन्हा जिल्ह्यात वैध दारूची दुकाने सुरू झाली. यामध्ये वाईन शॉप, बिअर शॉप, बिअर बार आणि देशी दारूची दुकाने याचा समावेश आहे. मात्र चंद्रपूर शहर वगळता जिल्ह्यात इतरत्र विदेशी दारूची दुकाने अत्यल्प आहेत. त्यातही तालुका ठिकाण वगळता ग्रामीण भागात दारूची दुकाने नाही असल्यात जमा आहेत. मात्र याच ठिकाणी मागणी आहे. त्यातही ज्यादा किंमत लावूनही दारू विकण्यात येते. ड्राय डे असल्यास तर या काळ्या धंद्याची चांदीच असते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील काही दारूच्या व्यावसायिकाकडून आपल्या दुकानातील दारूचा इतरत्र पुरवठा केला जातो. यात टोपण नावाने परिचित असलेल्या दारू व्यावसायिकाने आपले जाळे पसरवले आहे.
तपासात काय होणे अपेक्षित? दारुच्या मालाची ओळख असते. त्यात बॅच नंबर तसेच इतर वैशिष्ट्य असते, त्यामुळे हा माल नेमका कुठल्या दुकानातील आहे याची माहिती उत्पादन शुल्क विभागाशी समन्वय साधून सहज माहिती होऊ शकतो. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दुकानातून हा माल एका विक्रेत्याने खरेदी कसा केला हा तपासाचा भाग आहे. सोबत कोण्या बोगस ग्राहकांच्या नावे हा माल दुकानातून काढण्यात आला, याचा देखील तपास व्हायला हवा. सोबत जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील दारू जप्त करण्यात आली. हा माल नेमका कुणाचा आहे, हे तपासून अशा दारूच्या दुकानांवर कारवाई पोलीस विभागाने केल्यास मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा: ED Raid : मुंबईसह नागपुरात ईडीची मोठी कारवाई; 15 ठिकाणी छापे टाकत केले करोडोंचे दागिने आणि रोकड जप्त