चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील मौजे वेळवा माल येथे शेतामध्ये काम करीत असताना अचानक वीज कोसळली. यात अर्चना मोहन मडावी (वय 28) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. खुशाल विनोद ठाकरे (वय 31), रेखा अरविंद सोनटक्के (वय 45 वर्ष), राधिका राहुल भंडारे (वय 22 वर्ष), सुनंदा नरेंद्र इंगोले (वय 45 वर्ष), वर्षा बिजा सोयाम (वय 40 वर्ष), रेखा ढेकलू कुळमेथे (वय 55 वर्ष) यांचा जखमीमध्ये समावेश आहे. खुशाल ठाकरे, वर्षा सोयाम, रेखा कुळमेथे यांच्यावर ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे उपचार चालू आहेत.
सिंदेवाही तहसील : तालुक्यातील देलनवाडी येथे कल्पना प्रकाश झोडे (वय 45) आणि अंजना रुपचंद पुसतोडे (वय 48) या दोघी शेतात काम करत असताना, वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनीता सुरेश डोंगरवार (वय 35) ही महिला जखमी झाली. तसेच कोरपना तालुक्यातील मौजा चनई बुज येथील पुरुषोत्तम अशोक परचाके हा 27 वर्षीय युवक शेतात काम करत असताना त्याच्यावर विज पडून तो मरण पावला.
गोंडपिपरी तहसील : वनमजूर भारत लिंगा टेकाम (वय ५३ वर्ष) हा वनविभागाचे काम करत असताना, अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत आनंदराव मारुती पेंदोर (वय 52 वर्ष) हे सुद्धा जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालय गोंडपिंपरी येथे दाखल केले आहे. तसेच मौजा बेटाळा येथे शेतशिवारात काम करीत असताना, प्रांजली पुरूषोत्तम ढोंगे (वय 40 वर्ष) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर चारगाव या गावांमध्ये वीज पडून दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तर बोरगाव मोकासा गावात वीज पडल्यामुळे दोन बैल देखील मृत्युमुखी पडले आहेत.
नागभीड तहसील : तालुक्यातील नांदेड या गावातील शफीया सीराजुल शेख ही 17 वर्षीय युवती रोवणीसाठी गेली असता, विज पडल्यामुळे ती जखमी झाली आहे. तिला पुढील उपचारासाठी तळोधी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या घटनेत मौजा सोनापुर तुकुम येथील रंजन जगेश्र्वर बल्लावार यांची एक म्हैस वीज पडून मरण पावली आहे. तर शेतावर काम करत असताना यातील बहुतांश लोकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -