चंद्रपूर : राईस मिल येथील तारांच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उजेडास आली. ही घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील बागल (मेंढा) या गावात घडली. मृत बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
नागभीड परिक्षेत्रातील मिंडाळा बिट नजीक बागल (मेंढा) येथील सदगुरु कृपा राईस मिलच्या परिसरात तारेचे कुंपण करून आहे. आज येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मिलमालक विलास गिरीपुंजे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. लागलीच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळापासून काही अंतरावर डुक्करसुद्धा मृतावस्थेत आढळले. त्यामुळे सुरुवातीला बिबट्याने डुकरावर हल्ला करून ठार केले. नंतर डुकराच्या कळपाच्या हल्यात आपला जीव वाचविण्यासाठी जात असताना कुंपणात बिबट्याचे दोन्ही पाय अडकले त्यामुळे त्याला बाहेर पडता न आल्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सदर बिबट हा एक ते दीड वर्षाच्या असून मादी आहे.
दरम्यान घटनास्थळी ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक वाकडे, वनपरिक्षेत्राधिकारी गायकवाड, वनरक्षक जीवतोडे, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, मानद वन्यजीवरक्षक विवेक कळंबेलकर, झेप निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. पावन नागरे, सदस्य क्षितिज गरमळे, गुलाब राऊत, मंगेश फुकट यांची उपस्थिती होती. मृत बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेत उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करीता वन परिक्षेत्र नागभीड येथे आणण्यात आले. शवविच्छेदन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिरिष रामटेके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष गभने, पशुसर्वचिकीत्सक डॉ. अस्मिता जगझापे यांच्या उपस्थितीत झाले.
हेही वाचा - अखेर आमदारानेच पकडली दारू! मग पोलीस प्रशासन कशासाठी?
हेही वाचा - आमदाराने ७ गाड्या दारू पकडूनही गृहमंत्र्यांना हवी 'स्पेसिफिक केस', पत्रकारांनाही म्हणाले प्रकरण द्या