चंद्रपूर - कोरोनाकाळात सर्वाधिक रुग्ण हे चंद्रपूर शहरात होते. त्यातही जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने आरोग्य यंत्रणा तोकडी पडायला लागली होती. भविष्यात ही स्थिती आणखी गंभीर होणार, अशावेळी कोरोनाच्या संदर्भात महापालिकेने पुढाकार घेऊन आरोग्य यंत्रणा उभारावी, अशी मागणी पुढे येऊ लागली. मात्र, मनपाच्या तिजोरीत एवढी मोठी यंत्रणा उभारण्यास पैसेच नसल्याचे मनपाच्यावतीने सांगण्यात आले होते. तर दुसरीकडे याच महिन्यात महापौर राखी कंचर्लावार यांच्यासाठी तब्बल साडे अकरा लाख मोजून ‘अल्फा नेक्सा कंपनीची एक्सएल ६’ ही नवी गाडी खरेदी करण्यात आली. त्यावर कळस म्हणजे महापौरांच्या थाटात कुठलीही कमी पडू नये म्हणून व्हीआयपी नंबरची मागणी करण्यात आली. एमएच 34 बीव्ही 1111 असा व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाला 70 हजार मोजण्यात आले. एकीकडे कोरोनाचे रुग्ण मृत्युशी झुंज देत असताना महापालिकेची अशी पैशांची निरर्थक उधळपट्टी यावर सर्वस्तरातून टीका केली जात आहे. ही धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.
महापौरांचा कार्यकाळ वादग्रस्त -
महापौर राखी कंचर्लावार यांचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक घोटाळ्याचे आरोप लागले. मात्र, त्यांनी सर्व बाबींचा प्रशासकीय बाब म्हणून अशा आरोपांवर स्पष्टीकरण देण्याऐवजी केराची टोपली दाखवली. डब्बा घोटाळा, भोजन पुरवठा घोटाळा, कचरा संकलनाच्या कामातील भ्रष्टाचार, असे अनेक आरोप त्यांच्याच काळात झाले. एवढ्यावरच हे वादग्रस्त प्रकरणे थांबली नाहीत. मनपात स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी हे पद असताना प्रसिद्धीसाठी अडीच लाख रूपये महिना याप्रमाणे एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. टॅक्स मूल्यांकनाच्या कामातही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. महापौर म्हणून कंचर्लावार यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले.
रुग्णावाहिकेचा प्रस्ताव धूळ खात -
फेब्रुवारी महिन्यात कोरोना महामारीच्या काळात मनपामध्ये किमान चार व्हेंटिलेटर रुग्णवाहिकेची गरज होती. शहरातील हजारो रुग्णांना खासगी व्हेंटिलेटर रुग्णवाहिकेसाठी हजारो रुपये मोजावे लागले. तसेच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली. मात्र, अशा बिकट परिस्थितीत एकही व्हेंटिलेटर रुग्णवाहिका महानगरपालिकेतर्फे घेण्यात आली नाही. मागील 15 महिन्यापासून 19 लक्ष रूपये किमंतीच्या व्हेंटिलेटर रुग्णावाहिकेचा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. परंतु रुग्णवाहिका घेण्याची संवेदनशीलता मनपाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी दाखवली नाही.
व्हिआयपी नंबरसाठी 70 हजार खर्च -
30 ते 35 हजार रुपये किंमतीचे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मनपातर्फे रुग्णांना उपलब्ध करून दिले असते, तरी शेकडो रुग्णांचे ऑक्सिजन अभावी गेलेले जीव वाचवणे शक्य झाले असते. निधीचे कारण सांगून या सर्व गोष्टी घेण्याचे मनपाने टाळले. मात्र, दुसरीकडे महापौर यांच्यासाठी साडे अकरा लाखांची गाडी खरेदी करण्यात आली, चार वेळा 1 आकडा असलेला वाहन क्रमांक 1111 मिळविण्यासाठी मानपान एआरटीओ कार्यालयात मनपाच्या तिजोरीतून 70 हजार रुपये खर्च केले. याचा खुलासा माहिती कार्यकर्ते राजेश बेले यांनी माहितीच्या अधिकारातून केला आहे.
हेही वाचा - भाजपला घाबरणाऱ्यांना पक्षाबाहेर हाकला, आपल्याला निडर लोक हवेत - राहुल गांधी