चंद्रपूर - शनिवारपासून सुरू होणाऱया महापौर चषकाच्या स्पर्धेवर आता वादाची ठिणगी पडली आहे. निमंत्रण पत्रिकेच्या नावावरून हा वाद निर्माण झाला असून यात महापौरांनी प्रोटोकॉलचा भंग केल्याचा आरोप आहे. याविरोधात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे हा वाद आता चांगलाच पेटण्याची दाट शक्यता आहे.
महानगरपालिकेतर्फे महापौर चषकाचे आयोजन दरवर्षी केले जाते. या माध्यमातून कबड्डी आणि कुस्ती स्पर्धेला वाव देण्याचा हेतू असतो. या वर्षी या स्पर्धेचे उद्घाटन 15 फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटक म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तर अध्यक्ष म्हणून बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव टाकण्यात आले आहे. तर, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव प्रमुख उपस्थिती पाहुणे म्हणून टाकण्यात आले. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार हा मान पालकमंत्र्यांचा असतो. एवढेच नव्हे तर बक्षीस वितरण समारंभ देखील हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते होणार असल्याचे या निमंत्रण पत्रिकेत नमूद आहे. याची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले आहेत. त्यांनी थेट जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापौरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्हाधिकारी याची पूर्ण चौकशी केल्यावरच पुढील कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी महापौरांनी हा प्रकार केला असल्याचे आता बोलले जात आहे.
हेही वाचा -
'कार्यकर्त्यांनो चिंता करु नका.. एका पावसानं राज्य बदलतं'
बंदोबस्तातील पोलिसांना 'ही' सुविधा पुरवली पाहिजे, शरद पवारांचे गृहमंत्र्यांना पत्र
गणेश नाईकांच्या गडाला सुरुंग, भाजप नगरसेवकांचा गट अजित पवारांच्या भेटीला