चंद्रपूर - ओशो म्हणजे विद्रोह, रुढीवादी संस्कृतीच्या विरोधात उभी असणारी धगधगती मशाल, ज्ञानाचा विशाल सागर, तर्क आणि विवेकाच्या आधारावर धर्मांच्या बागलबुवांना उडवून लावणारा भुसुरुंग. यामुळेच ओशोने केवळ भारतालाच नव्हे तर, संपूर्ण जगाला आपली भुरळ पाडली. हा प्रभाव अजूनही कायम आहे. भारतभर व्याख्यान देणारे रजनीश ते जगभरातील श्रीमंती ज्यांच्या पायाखाली होती असे ओशो या एकाच व्यक्तीचा आवाका उत्तुंग असाच आहे. मात्र, क्वचितच कुणाला माहिती असेल की, ओशो यांचे चंद्रपूरशी घट्ट नाते जुळलेले होते.
हेही वाचा - ‘मिशन कवचकुंडल’अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात रोज 220 केंद्रांद्वारे होणार लसीकरण
मदनकुंवर रेखाचंदजी पारख यांना ओशो आपली पूर्वजन्मीची आई मानत होते. याच मायेपोटी त्यांचे नेहमी चंद्रपुरात येणेजाणे असायचे. त्यांच्याच घरी ओशोंनी ध्यानसाधना केली, चिंतनमनन केले. मदनकुंवर पारख यांचे पुत्र दीपक पारख आणि पुत्री सुशीला कपाडिया यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले.
कोण आहेत मदनकुंवर पारख
मदनकुंवर पारख यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1919 ला वरोरा येथे आपल्या आईच्या माहेरी झाला. तर, त्यांचे बालपण हे छत्तीसगड येथील मुंगेली येथे आपल्या मावशीकडे गेले. श्वेतांबर जैन कुटुंबातील मदनकुंवर यांना वयाच्या दहाव्या वर्षीच साधूंच्या सत्संगास बसण्याचा ध्यास लागला. याच कोवळ्या वयात त्यांनी गायन, संगीत, नृत्य, संस्कृत भाषा, राशी-भविष्य, आयुर्वेदिक विषयात प्राविण्य मिळवले. त्यांचा विवाह चंद्रपूरचे रेखाचंदजी पारख यांच्याशी झाला. हे धनाढ्य कुटुंब होते. त्यांची पारंपरिक शेती होती. स्वतःचा लॉज, खानावळ आणि सुताचे दुकान होते. मदन यांचा रुढीवादी कुटुंबात जन्म झाला असला तरी त्या या बंडखोर प्रवृत्तीच्या होत्या. त्या कविता करायच्या. त्यांनी आपल्या घरीच अनाथालय उघडले, ज्यात त्यांनी साडेतीनशे मुलांचे संगोपन केले. तीन वर्षांपूर्वी 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, अखेरच्या क्षणी देखील त्यांची स्मृती शाबूत होती, असे त्यांचे कुटुंबीय सांगतात.
ओशोशी पहिली भेट
1960 मध्ये वर्धा येथे जैन समाजाच्या वतीने साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले, ज्यात आचार्य रजनीश यांना निमंत्रण देण्यात आले. मदनकुंवर यांना देखील कविता सादर करण्यासाठी बोलाविण्यात आले. यात दोघेही एकमेकांना शोधत होते. दोघांची भेट घडली. कुठलाही पूर्वपरिचय नसताना दोघेही एकमेकांना बघत होते. या कार्यक्रमात रजनीश यांचे व्याख्यान झाले, जे ऐकून मदनकुंवर मंत्रमुग्ध झाल्या, तर रजनीश हे मदनकुंवर यांच्या कवितांनी प्रभावित झाले. रजनीश म्हणाले की, आपण माझ्या 700 वर्षांपूर्वी आई होत्या. मदनकुंवर यांना देखील बालपणीपासून आपल्या पूर्वजन्मीच्या मुलाचे स्वप्न पडत होते. त्यांनाही रजनीश हेच आपले पुत्र होते अशी खात्री पटली. मासा आनंदमयी असे नाव त्यांनी त्यांचे ठेवले आणि यानंतर सुरू झाला आचार्य रजनीश म्हणजेच ओशोंचा चंद्रपूर प्रवास. जवळपास तीसएक वेळा ओशो चंद्रपुरात आले.
सारंग इमारत आणि ध्यानसाधना
पारेख कुटुंब सारंग नावाच्या वाड्यात राहायचे. इथेच ओशो अनेक दिवस राहायचे. ते किती दिवस राहणार याची पूर्वकल्पना ते आधीच देऊन ठेवत. यादरम्यान त्यांच्यासाठी वेगळी खोली आणि वेगळी व्यवस्था असायची. याच खोलीत ओशो ध्यानसाधना करायचे. तासंतास ओशो याच खोलीत असायचे. ही इमारत ओशोंच्या अध्यात्मिक जडणघडणीची साक्ष आहे. याच ठिकाणी मदनकुंवर ओशो यांना उपदेश, मार्गदर्शन करायच्या. ओशो देखील त्यांचे म्हणणे ऐकायचे. त्यांच्यात सखोल अध्यात्मिक, वैचारिक चर्चा व्हायच्या.
पत्रांचे आदानप्रदान
प्रवचन आणि व्याख्यानासाठी आचार्य रजनीश भारतभर भ्रमंती करायचे. मात्र, त्यांचे मन नेहमीच आपल्या मानलेल्या आई आनंदमयी म्हणजेच, मदनकुंवर यांच्यात गुंतलेले असायचे. यावेळी ओशो पत्र लिहायचे. 22 नोव्हेंबर 1960 ला ओशो यांनी पहिले पत्र लिहिले होते. याचे उत्तर मदन कवितेच्या माध्यमातून द्यायच्या. 27 ऑगस्ट 1964 ला ओशोंनी शेवटचे पत्र लिहिले. यादरम्यान शेकडोंचा पत्रव्यवहार त्यांच्यात झाला. सुरुवातीच्या 120 पत्रांचे पुस्तक 'क्रांतिबीज' नावाने प्रकाशित करण्यात आले. तर, इतर 100 पत्रांवर 'भावनाओ के भोजपत्र पर ओशो' या नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पत्रांची भाषा ही अत्यंत गूढ आणि गहन आहे.
ओशोंची पहिली कार, कॅमेरा चंद्रपुरातून
ज्यावेळी ओशो हे आचार्य रजनीश होते तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. यावेळी पारेख कुटुंबाने ओशोंना अनेक भेटवस्तू दिल्या. स्टॅंडर्ड नावाची पहिली कार ही पारेख कुटुंबानेच त्यांना भेट दिली. एवढेच नाही ओलम्पिया कंपनीचे टाईपराईटर, अकाईचे टेपरेकॉर्डर, कॅमेरा, घडी, पेनचा सेट अशा अनेक भेटी ओशोंनी पारेख कुटुंबाकडून स्वीकारल्या.
आपल्या पूर्वजन्मीच्या मातेची घोषणा
मदन यांना आपली पूर्वजन्मीची माता म्हणून ओशोंनी आधीच स्वीकारले होते. याची अधिकृत घोषणा माउंट अबू येथे सुरू असलेल्या शिबिरात ऑक्टोबर 1973 ला करण्यात आली. त्यांचे चरणस्पर्श ओशो यांनी केले. यावेळी त्यांचे नामकरण मा आनंदमयी असे करण्यात आले. त्यानंतर त्यांना संन्यासाची दीक्षा देण्यात आली.
विदेशी अनुयायांची चंद्रपूरवारी
1974 नंतर जेव्हा ओशो यांच्या मुंबईतील आश्रमात जागा कमी पडू लागली तेव्हा विदेशातून येणाऱ्या अनुयायांना त्यांनी चंद्रपुरात पाठविले. त्यावेळी मदनकुंवर यांची सावली तालुक्यातील उसेगाव येथे जागा होती. येथे विदेशी अनुयायांची व्यवस्था करण्यात येत होती, ज्याला 'प्रोजेक्ट कैलाश' असे नाव देण्यात आले. आनंदमयी या त्यांना भारतीय संस्कृतीबाबत शिकवण द्यायच्या.
..अन विदेशींनी लस्सीसाठी गाय गाडीवर आणली
येथे येणाऱ्या विदेशी अनुयायांना लस्सी आणि गाजराचा हलवा फार आवडायचा. एक दिवशी तर या अनुयायांनी कळस केला. त्यांना लस्सी दुधापासून बनते फक्त एवढेच माहिती होते. एक दिवशी ते मोठी गाडी घेऊन गेले आणि त्यात चक्क गाय घेऊन आले आणि म्हणाले आम्हाला लस्सी बनवून द्या. हे बघून सगळ्यांनीच डोक्यावर हात मारला, अशी आठवण मदनकुंवर यांची मुलगी सुशीला कपाडिया सांगतात.
सुशीला यांच्या विवाहाला उपस्थिती
सुशीला यांचा विवाह 1964 ला सारंग इमारतीच्या प्रांगणात झाला. यावेळी ओशो यांनी आवर्जून उपस्थिती लावली. सुशीला यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्यांनी त्यांना भेट म्हणून सतार आणली होती. यावेळी ओशो यांनी प्रवचन देखील दिले होते. त्यांना सुशीला यांनी कधीच वाचन करताना पाहिले नाही, मात्र त्यांना प्रत्येक धर्माचा गाढा अभ्यास होता, असे त्या सांगतात. मा आनंदमयी यांनी ओशो यांना विदेशात न जाण्याचा सल्ला दिला होता, मात्र ओशो विदेशात गेले. त्यानंतर ओशोचा चंद्रपूरशी संबंध होऊ शकला नाही.
ती इमारत आता जमिनदोस्त होणार
ज्या सारंग इमारतीत ओशो यांचे वास्तव्य होते, जिथे ते बसून ध्यान साधना, चिंतन - मनन करायचे ती इमारत आता पूर्णतः जीर्ण झाली आहे. म्हणून, त्याला पाडण्याचा निर्णय मदनकुंवर यांचे पुत्र दीपक पारेख यांनी घेतला आहे.
अशा पद्धतीने ओशो यांच्या आठवणी चंद्रपुरात आहेत. मा आनंदमयी आणि ओशो यांच्यात झालेला पत्रव्यवहार हा पारेख कुटुंबीयांनी अजूनही सुरक्षित ठेवला आहे. देशातच नव्हे तर, जगाला आपल्या तर्क, तत्वज्ञान, अध्यात्म, आणि विद्वत्तेने भारावून सोडणाऱ्या ओशो यांचे चंद्रपूर कनेक्शनशी अजूनही अनेकजण अनभिन्नच आहेत.
हेही वाचा - ताडोबाचे कोअर क्षेत्र आजपासून पर्यटकांकरिता खुले; स्थानिक रोजगाराला मिळणार चालना