चंद्रपूर - देशात व राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत चालले आहे. देशाची सध्यास्थिती नियंत्रणात असून पुढे विकराळ रूप घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामूळे या विषाणूच्या प्रभावी औषधांचे संशोधन सुरू आहे. या औषधीच्या चाचणीसाठी मानवी शरीराची गरज लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील व सध्या चिमूर शहरात राहणाऱ्या ध्येयवेड्या निलेश राठोडने देहार्पण करण्याचा संकल्प केला आहे. तसे पत्र उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे. औषध संशोधनासाठी मानवी शरीराची गरज असल्यास माझे शरीर देणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यावर नियंत्रणासाठी राज्यातील सर्व डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, सफाई कामगार, समाजसेवी संस्था, पत्रकार, पोलीस यंत्रणा, नगर पालिका कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूविरोधातील लढाईमध्ये सहभागी होत सेवा देत आहेत. तसेच आपल्या स्तरावरून समाजमाध्यमांद्वारे जनजागृती करत आहेत. यासर्व परिस्थितीमध्ये आपणही देशासाठी तसेच मानवतेसाठी काहीतरी करावे असे वाटून असंख्य नागरिक आपल्यापरीने सेवा देत आहेत.
चिमूर तालुक्यामध्ये प्रगतशील तज्ज्ञ शेतकरी म्हणून नावलौकिक असलेले लोहारा या गावातील निलेश राठोड सदैव सामाजिक उपक्रमामध्ये सक्रीय असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरीता मागील वर्षी त्यांनी केलेले आमरण ऊपोषण फारच गाजले होते. कोरोना विषाणूविरोधात आपणही काहीतरी करावे, ही भावना निलेश यांच्या मनात जागृत होऊन त्यांनी कोरोना विषाणूवर उपचारासाठी होत असलेल्या संशोधनामध्ये चाचणीसाठी मानवी शरीर लागणार असल्याने देहार्पन करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी देहार्पन करत असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या नावाचे पत्र चिमूर उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांना दिली आहे. त्यांच्या या समर्पनाचे सर्व स्तरातून अंभिनंदन करण्यात येत आहे.