चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत आशादायी चित्र समोर येत आहे. आतापर्यंत 12 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आता केवळ दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील पहिल्या रुग्णाला नागपूर येथून सुट्टी देण्यात आली होती. तर एका युवतीला दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने नव्याने जाहीर केलेल्या आरोग्य सूत्रानुसार 19 व 20 मे रोजी पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना 10 दिवसानंतर कोणतीही लक्षणे न दिसल्यामुळे कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.
कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच, आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित असून सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे. तर,आयएलआय, सारीचे 9 नमुने घेतले असून सर्वच आयएलआय, सारीचे 9 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत एकूण 906 स्वॅब नमुने तपासणी पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 22 नमुने असून निगेटिव्ह 817 आहे तर 67 नमुने प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 71 हजार 914 नागरिक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. तसेच 61 हजार 134 नागरिकांची गृह अलगीकरण पूर्ण झाले असून 10 हजार 780 नागरिकांचा गृह अलगीकरणचा कालावधी सुरू आहे.