चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी, राजूरा, कोरपना, जिवती तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसाचा फटका धान (भात), सोयाबीन, कपाशी, तूर पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ माजवला. यामुळे शेतात उभे असलेले धानपिक, कपाशी, तूर, सोयाबीन सारख्या पिकांना या पावसाची झळ बसली तर, धानपिके जमिनीवर लोळली. या पावसाचा बळीराजाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा - बिबट्याच्या चामडीसह ९ आरोपी ताब्यात; भरारी पथकाची कारवाई
दिवाळीचे दिवस असल्याने कर्मचाऱ्यांनीही नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्याकडे पाठ फिरवली. दरम्यान, राजुरा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांचे समर्थन घेण्यास भाजप-सेनेत रस्सीखेच, फडणवीसांनी दिला प्रस्ताव