चंद्रपूर - उन्हाळ्यात बाजारपेठेत आंब्याच्या विक्रीला ऊत येतो. हापूस, नीलम, बैगमपल्ली, लंगडा, दशरथी अशा आंब्यांची रेलचेल असते. मात्र गावठी आंब्याची चवच न्यारी. छोट्याशा आंब्यात जो रस असतो त्याची सर दुसऱ्या आंब्यात नाही. विशेषतः रस बनविण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मात्र, या वर्षी आंब्याला बहरच आला नाही. त्यामुळे, उत्पादन देखील जवळपास ठप्प झाले होते. शेताच्या बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडातून उन्हाळ्यात किमान एक लाख तरी मिळकत मिळायची. मात्र, या वर्षी आंबेच नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
हेही वाचा - Anchaleshwar Temple : चंद्रपुरात चारशे वर्षांपूर्वीच लागला ईमोजीचा शोध; आश्चर्य वाटले ना... तर हे एकदा वाचाच
चंद्रपूर जिल्ह्यात आंब्याचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेतले जात नाही. शेताच्या पारावर ही झाडे लावण्यात येतात. उन्हाळा आला की ही झाडे पिवळ्या बहरची शालू पांघरते. अनेक ठेकेदार आंबा बघून ही झाडे ठेक्याने घेतात. त्यातून एक दीड लाख इतके उत्पन्न शेतकऱ्यांना होते. आधीच पारंपरिक शेती आणि निसर्गचक्राची मार सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. मात्र, या वर्षी आंब्याला बहरच आला नाही. बहर न आल्याने शेतकरी देखील तिकडे भटकला नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
चंद्रपूरच्या बाजारात गावठी आंब्याची विशेष मागणी आहे. यासाठी टोपले घेऊन महिला स्वतंत्र विक्री करतात. आंब्याचा रस हा उत्तम बनत असल्याने महाराष्ट्रातील जनता मोठ्या आवडीने याची खरेदी करतात. मात्र, सध्या बाजारात गावठी आंबा दुर्लभ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे, त्याच्या भावावर देखील परिणाम झाला आहे. तरीही इतर आंब्यांच्या जातीच्या तुलनेत हा दर परवडण्यासारखा आहे. मात्र, गावठी आंबाच दुर्लभ झाल्याने ग्राहकांचा देखील हिरमोड होत आहे.
हेही वाचा - Tiger took last breath : ताडोबातील सर्वात मोठ्या 'वाघडोह' वाघाने घेतला अखेरचा श्वास