चिमूर (चंद्रपूर) - दिवसेंदिवस देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीबांच्या, मजुरांच्या पोटाचा प्रश्न निर्णाम झाला होता. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत ५ किलो तांदूळ वितरीत करण्यात येत होते. मात्र, जुलैपासून प्रति सदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे देशासह राज्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक मजूर, गोरगरीब जनतेपुढे पोट भरण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै महिन्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र प्राधान्य कुटुंब तथा अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका धारकांना प्रति सदस्य पाच किलोप्रमाणे स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरण करण्यात आले.
पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वितरणाचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत वाढवला असून, आता मात्र नागरी अन्न पुरवठा व वितरण विभागाने संबंधित लाभार्थ्यांना फक्त तांदूळच न देता गहूसुद्धा देण्याचे ठरवले आहे. त्याप्रमाणे जुलैपासून शिधापत्रिकामध्ये नमूद प्रति सदस्य ३ किलो गहू व दोन किलो तांदुळ वितरित केले जाणार आहेत. याकरीता संबंधित वितरण व पुरवठा यंत्रणेला निर्देश देण्यात आल्याची माहिती तालुका निरीक्षण अधिकारी चिमूर आशिष फुलके यांनी दिली.
चिमूर तालुक्यातील लाभार्थी
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत चिमूर तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनाचे १० हजार २४५ व प्राधान्यक्रम कुटुंब २६ हजार ०९० असे एकूण ३६ हजार ३३५ शिधापत्रिका धारकांना प्रती सदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदुळ मिळणार आहेत.