राजुरा (चंद्रपूर) - कोरपना तालुक्यातील पिपरी (नरांडा) या गावात बैलांच्या गोठ्याला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. गावकरी वेळीच धावून गेल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
कोरपना तालुक्यातील पिपरी येथील किशोर पावडे यांचा बैलांच्या गोठ्याला बुधवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. गावाच्या मध्यभागी हा गोठा असल्याने गावात एकच धांदल उडाली होती.
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, अग्निशमन दलाची वाट न बघता गावकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत गोठा आणि बैलांचा चारा जळून खाक झाला आहे.