चंद्रपूर - गावालगतच्या तलावात बैलांना धुण्यासाठी व आंघोळीसाठी गेलेला एक शेतकरी तलावात बुडाल्याची घटना चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे घडली होती. देवराव झोडे (वय ५०) असे बुडालेल्या शेतकऱ्याचे नाव होते. शनिवारी व रविवारी बोटीच्या साहाय्याने पोलीस विभागाने शोधमोहीम राबविल्यानंतर त्याचा शोध लागला नाही. मात्र, तब्बल तिसऱ्या दिवशी सोमवारी त्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला आहे.
हेही वाचा... 'बुलाती है मगर जाने का नही..' तृप्ती देसाई यांचं इंदोरीकर आणि समर्थकांना आव्हान
शनिवारी दुपारी देवराव झोडे हे बैल धुण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी तलावाकडे गेले. त्यांनी बैल धुतल्यानंतर तलावाकाठी कपडे काढून ठेवले आणि अंघोळीसाठी तलावात उडी घेतली. परंतु खोल पाण्यात गेल्याने ते बुडू लागले. वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा तलावालगत खेळत असलेल्या मुलांनी तलावाकडे धाव घेतली. त्यांनीही आरडाओरड केल्यामुळे घटनास्थळी इतर नागरिकांनी गर्दी केली.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बोटीच्या साहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. परंतु रविवारी रात्रीपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. तब्बल तिसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी पोलिसांना त्यांचा मृतदेह मिळाला. पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.