चंद्रपूर - वाघाने हल्ला चढविलेल्या गायीला वाचविण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला आहे. यात गुराख्याचा मृत्यू झाला आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील बफर झोनमधील करवन गावाजवळ ही घटना घडली. भीमराव वेलादी असे गुराख्याचे नाव आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मूल वनपरिक्षेत्रातील करवन येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास गुराखी नेहमी प्रमाणे गुरांना चरायला जंगलात घेऊन गेला. त्याच्यासोबत आणखी चार सहकारी होते. या दरम्यान दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक गुरांवर हल्ला चढविला. यावेळी भीमरावने आरडाओरडा केली मात्र वाघाने आक्रमकपण त्यांचे लचके तोडले.
वाघाच्या तावडीतून गायीला सोडविण्यासाठी भीमराव गेला असता, वाघाने थेट त्याच्यावर हल्ला चढविला. त्याने आरडाओरडा केली. त्यामुळे जवळी त्याचे सहकारी धावून आले मात्र, वाघाला पाहून पळून गेले. या हल्ल्यात भीमराव वेलादी या गुराख्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मूलचे वानपरिक्षेत्र अधिकारी एस.जे. बोबडे हे सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. गेल्या काही दिवसांत वाघांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने अशा घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.