चंद्रपूर - शेतकऱ्याने विषारी रसायन पिऊन आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील घडोली गावात घडली. प्रदीप पत्रू सातपुते, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.
प्रदीप सातपुते यांच्याकडे १८ एकर शेती आहे. त्यासाठी त्यांनी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. मात्र,गेल्या दोन वर्षात त्यांना सातत्याने नापिकीचा सामना करावा लागला. त्यामुळे उत्पादनच नाही, तर कर्ज फेडायचे कसे? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. व्याजाचा दर दिवसेंदिवस वाढत होता. अखेर त्यांच्यावर १५ लाख रुपयांचे कर्ज जमा झाले होते. यंदाही त्यांना पुराच्या पाण्याचा चांगलाच फटका बसला. यामुळे कपाशी आणि तांदुळ पिकाला मोठे नुकसान झाले.
दरम्यान हप्ता न भरल्याने त्यांचे ट्रॅक्टर देखील कंपनीचे अधिकारी घेऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा झाला होता. त्यांनी सोमवारी रात्री विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा आहे.