चंद्रपूर - शहरात आज दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे यापुढे रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन) करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
आज पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. मोठ्या संख्येने नागरिक रेडझोन व जोखमीच्या जिल्ह्यातून परतल्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार 13 मेपासून 17 मे पर्यंत फक्त चंद्रपूर शहरात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे 14 मे पासून शहरांमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 2 खुली राहणार आहेत. नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची सूची तयार होणे, त्यानंतर या परिसरातील संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणी करणे, परिसराची संपूर्ण नाकाबंदी करणे, आरोग्य पथक प्रत्येक घराच्या तपासणीसाठी गठित करण्याचे काम सुरू झाले आहेत. तसेच रुग्णाचा रहिवासी परिसर सील केला आहे. 293 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 पॉझिटिव्ह, 237 नागरिक निगेटिव्ह तर 54 नागरिकांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.