चंद्रपूर - आरटीओ नियमांचे पालन न करता रस्त्यावर धावणाऱ्या डीएनआर ट्रॅव्हल्सच्या डिझेल टँकरला 'ईटीव्ही भारत'च्या बातमीनंतर अखेर जप्त करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अशाच प्रकारची इतर दोन टँकर देखील आरटीओ विभागाने जप्त केली आहेत. या टँकरची कागदपत्रे आणि परवान्यांची चौकशी करण्यात येणार आहे. ते सादर न केल्यास यावर रीतसर कारवाई करण्यात येणार ( chandrapur rto dnr diesel tanker seized ) आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी आगीच्या दोन भीषण घटना घडल्या आहेत. चिचपल्ली मार्गावर डिझेल टँकरच्या भीषण अपघातात तब्बल नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, दुसरी घटना ही बल्लारपूर येथे घडली. बल्लारपूर पेपरमिलच्या लाकूड डेपोला आग लागली. 55 हजार टन लाकूड यात जळून राख झाले होते. आगीच्या एका लहान ठिणगीने ह्या घटना घडल्या आहेत. तर, दुसरीकडे डीएनआर ट्रॅव्हल्सद्वारे भर रस्त्यावर टँकरने ट्रॅव्हल्समध्ये डिझेल भरले जात होते.
MH 34 BG 5977 या वाहन क्रमांकांच्या टँकरमधून डिझेल भरण्याचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. असे करणे बेकायदेशीर आहे. मात्र, कारवाई करण्यास शासकीय यंत्रणांकडून जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात येत होती. याबाबत 3 जूनला 'ईटीव्ही भारत'ने हे प्रकरण उजेडात आणले होते.
याप्रकरणाची आरटीओ विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी तात्काळ दखल घेतली होती. तसेच, हे टँकर कार्यालयात जमा करून त्याची चौकशी करत कारवाई करण्याचे आदेश परिवहन निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र, तब्बल पाच दिवस लोटले तरी या डिझेल टँकरचा शोध संबंधित कर्मचारी लावू शकले नाही. विशेष म्हणजे हे वाहन नेहमी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील ओम भवन समोरील डीएनआर कार्यालयासमोर उभे होते. याबाबत 9 जूनला 'उपप्रादेशिक अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांकडून दिशाभूल' ईटीव्ही भारतने प्रकाशित केले. यानंतर कर्मचारी खळबळून जागे झाले. अखेर आज डीएनआरचे ते डिझेल टँकर हे जप्त करण्यात आले आहे.
ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्यासाठी आवश्यक असणारे परवाने आधी गाडी मालकांना सादर करावे लागणार आहे. ती सादर न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती किरण मोरे यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना दिली.
आणखी दोन डिझेल टँकरवर कारवाई - केवळ डीएनआरचेच डिझेल टँकर नव्हे, तर अशाच पद्धतीचे अनेक अनधिकृत टँकर देखील रस्त्यावर धावत आहेत. 'ईटीव्ही भारत'ची बातमी प्रकाशित होताच, अशा टँकरवर देखील कारवाई करण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ( 10 जून ) दोन टँकर जप्त करण्यात आले आहेत.
डीएनआरने केले डिझेल टँकरचे टायर गायब - हे टँकर आरटीओ विभागाने कार्यालयात जमा करू नये, म्हणुन या वाहनाचे टायर काढण्यात आले. तसेच, त्याला गॅरेजमध्ये ठेवण्यात आले असे असूनही हे टँकर जप्त करण्यात आले आहे. जोवर चौकशी पूर्ण होत नाही, तोवर हे वाहन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - ETV Bharat Impact : अखेर कोल्हापुरात होणार 'राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा'