चंद्रपूर Dhammachakra Pravartan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांना नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. यानंतर बाबासाहेबांनी 16 ऑक्टोबरला चंद्रपुरात येऊन देखील आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. नागपूर नंतर चंद्रपूर हे या ऐतिहासिक क्रांतीचे साक्षीदार आहे. तेव्हापासून येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा केला जातो. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारपासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
प्रबोधनाची शिदोरी : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या महोत्सवाच्या साक्षीदार होण्यासाठी बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग दीक्षाभूमीवर येतो. चंद्रपूर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक आंबेडकरी अनुयायी येथे येतात. या दोन दिवसात बहुजन चळवळीची वैचारिक मेजवानी असते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक मान्यवर, वक्ते येथे येतात. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांसाठी ही एक मोठी शिदोरी असते.
लाखो पुस्तकांची विक्री : या महोत्सवाच्या दिवशी ठिकाणी पुस्तकांचे मोठे स्टॉल लागतात. यात बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांच्या जीवनचरित्रावर लिहिलेली पुस्तके, (Dr Babasaheb Ambedkar Books) गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, गाडगेबाबा तसेच बहुजन चळवळीविषयीची पुस्तके असतात. या महोत्सवाचे हे मोठे आकर्षण आहे. या दोन दिवसांत लाखों पुस्तकांची विक्री येथे केली जाते.
काय आहे इतिहास ? : इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात 'अशोक विजयादशमी' म्हणून साजरा केला जातो. सम्राट अशोकांनी केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचं ठरवलं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या ५ लाख अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळं या पवित्र भूमीचं ‘दीक्षाभूमी’ असं नामकरण करण्यात आलं.
हेही वाचा -