चंद्रपूर - किरकोळ वादातून युवकाने शेजारच्याच वयोवृद्ध व्यक्तीवर ट्रॅक्टर चालवल्याची घटना घडली. यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे बुधवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
19 वर्षीय आरोपी रोहन माळवे आणि 62 वर्षीय दयाराम रंदेय यांच्यात मंगळवारी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपी रोहन माळवे यांनी तुला ट्रॅक्टरने उडवून देतो, अशी धमकी दिली होती. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मंडळ कृषी कार्यालयाजवळ रोहन मांडवे याने रस्त्यावरून चाललेल्या दयाराम रंदये यांना ट्रॅक्टरची धडक दिली. यात रंदये गंभीर जखमी झाले.
दयाराम रंदेय यांना उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे नेले असता, तिथे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रोहन माळवे यांना अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.