चंद्रपूर - जिल्ह्याला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात त्याच्या मुलाचाही समावेश आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात आधीच त्याची पत्नी आणि मुलगी बाधित नसल्याचे समोर आले होते.
जिल्ह्यामध्ये फक्त एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्णाला कोविड शिवाय अन्य आजाराच्या विशेष तपासणी करिता सायंकाळी नागपूरला हलविण्यात आले. रुग्णाच्या संपर्कातील 44 नागरिकांचे स्वॅब नागपूरच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 24 नमुने निगेटीव्ह आहे. जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती जैसे थे असून बाहेरून आलेल्या प्रत्येक कामगाराला, मजुराला 14 दिवसांसाठी गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या कुटुंबातील सदस्य तसेच परिसरातील अन्य व्यक्ती व हा रुग्ण काम करत असलेल्या अपार्टमेंटमधील यापूर्वीच पाठविण्यात आलेल्या एकत्रित 44 पैकी 24 नागरिकांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आहे. अन्य 7 अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आज आणखी परिसरातील चौकशीमध्ये रुग्णाच्या संपर्कातील आतापर्यंतच्या 71 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.