चंद्रपूर - येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या जीसीसी टीबीसी परिक्षेत गैरप्रकार झाल्याची घटना घडली आहे. मूल येथील नवभारत विद्यालयाच्या केंद्रावर हा गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.
17 जुलैला संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जीसीसी टीबीसी (गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स) ही परीक्षा घेतली गेली होती. यावेळी चंद्रपूरच्या मूल येथील केंद्रावर तीन कॉम्प्युटरचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड बाहेरील एका इन्स्टिट्यूटला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. परिक्षेदरम्यान बॅच क्रमांक 101, 102, 103 मध्ये काही विद्यार्थी हे कॉम्प्युटर समोर नाममात्र असलेले दिसून आले. ते कोणत्याही प्रकारची परीक्षा देत नव्हते. त्यांचा कॉम्प्युटर बाहेरील इन्स्टिट्यूट मधून चालविला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी केंद्रीय कर्मचारी नसलेल्या शिरीष खोब्रागडे नामक व्यक्तीची या केंद्रावर नेमणूक करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारच्या सेवेत नसलेल्या व एका खासगी इन्स्टिटय़ूट सोबत संबंध असलेल्या खोब्रागडे यांच्या बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.