चंद्रपुर - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून डॉ. विश्वास झाडे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे. त्या दृष्टीने त्यांनी गाठीभेटी घेणेही सुरू केले आहे. मात्र, यापूर्वी राजकारणाचा कुठलाही गंध नसलेल्या डॉ. झाडे यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होत आहे. पोंभुर्णा येथील एका बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी डॉ. झाडे यांच्या समोरच, त्यांना विरोध करीत बैठकीतून वॉकआउट केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हेही वाचा... 'कमळ' हाती घेता घेता, आमदार भारत भालकेंनी हातात बांधले 'घड्याळ'
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन निवडून आलेले राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तिसऱ्यांदा या विधानसभेतुन लढणार आहेत. अर्थमंत्री बनल्यापासून त्यांनी विकासाचा झंझावात या क्षेत्रात सुरू केला. त्यामुळे त्यांना टक्कर देणारा सक्षम उमेदवार काँग्रेसकडून देणे अपेक्षित आहे. मात्र, काँग्रेसकडून ही उमेदवारी डॉ. विश्वास झाडे यांना देण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. मात्र, यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नाराजी आहे. मुळचे चंद्रपुर येथील डॉ. विश्वास झाडे यांचा यापूर्वी कधीही राजकारणाशी संबंध आलेला नाही. त्यांनी साधी नगरसेवकाची देखील निवडणूक लढवलेली नाही, असा स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतले की नाही, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळेच डॉ. झाडेंच्या उमेदवारीचा विरोध होत आहे.
हेही वाचा... 'मंत्रिपद' देणार तिकडूनच लढणार - अनिल गोटे, सेना प्रवेशाचेही दिले संकेत
मुनगंटीवारांच्या विरोधात डॉ. विश्वास झाडेंच्या रुपात डमी उमेदवार दिला आहे, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्याजागी मागील पाच वर्षात जनतेच्या समस्या घेऊन सातत्याने संघर्ष करणाऱ्या राजू झोडे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. डॉ. झाडे हे कार्यकर्त्याच्या बैठकीला गेले असता, त्यांच्या समोरच स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. आम्हाला असा उमेदवार नको, असे म्हणत कार्यकर्त्यांनी वॉकआऊट केले. याचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांत चांगलाच व्हायरल होत आहे.