चंद्रपूर - जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या 84 नागरिकांपैकी 52 लोकांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यातील 44 नमुने निगेटिव्ह आहेत. तसेच पॉझिटिव्ह रुग्णाच्या प्रतिबंधीत क्षेत्रातील 8 हजार 540 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आज काढण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूरमध्ये प्रतिबंधित कृष्णनगर परिसरातील कोविड रुग्णाला अन्य आजारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी विलगीकरण कक्षात आहेत. त्यांचे नमुने यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत.
कृष्णनगर व लगतच्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून २ मे रोजी जाहीर करण्यात आले होते. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोनासोबतच अन्य आजाराची देखील तपासणी केली जात आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर 24 तासात संबंधित क्षेत्रांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. तथापि, या परिसरातील 3 मेपासून 8 मेपर्यंत सतत 6 दिवस 47 वैद्यकीय पथके तपासणी करीत असून आतापर्यंत 2 हजार 152 कुटुंबातील 8 हजार 540 नागरिकांची चौकशी व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये कोरोना संदर्भात ८ मे रोजीपर्यंत एकूण 192 स्वॅब नमुने घेण्यात आले. आत्तापर्यंत 168 नमुने निगेटिव्ह आले आहेत. या पैकी 23 नमुने प्रतीक्षेत आहेत. तर केवळ एक नमुना पॉझिटिव्ह आलेला आहे.