चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आले. तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प पडून आहे. सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षाने विविध योजनांचा निधी परत गेला. विविध कामे ठप्प पडली आहे. याविरोधात काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूरकर यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कक्षासमोरच ठिय्या मांडला.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, अनेक मजुरांना अजूनही कामे मिळाली नाही. जिथे कामे झालीत, तेथील मजुरांना मजुरी देण्यात आली नाही. घरकुलाचा निधी अद्याप मिळाला नाही. सिंचन विहिरीचे अनुदान मिळाले नाही. सार्वजनिक शौचालय बांधकामाचा निधी मिळाला नाही. रस्ते विकासाची अनेक कामे बंद पडली आहे.
विविध योजनावरचा निधी ३१ मार्चपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाला खर्च करायचा होता. मात्र, हा निधी खर्च करण्यात आला नाही. तो निधी पदाधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे परत गेला. भाजप शासित जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील विकासकामे ठप्प पडलेली आहेत, असा आरोप करीत गटनेते डॉ. सतीश वारजूरकर यांनी सीईओच्या कक्षासमोर ठिय्या मांडला होता.